बनावट खताचा साठा जप्त !

By Admin | Updated: July 11, 2016 00:26 IST2016-07-11T00:06:24+5:302016-07-11T00:26:07+5:30

लातूर : निलंगा तालुक्यातील येळनूर परिसरात एका खत विक्रेत्याच्या गोडावूनवर रविवारी कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा मारला.

Fake stocking seized! | बनावट खताचा साठा जप्त !

बनावट खताचा साठा जप्त !


लातूर : निलंगा तालुक्यातील येळनूर परिसरात एका खत विक्रेत्याच्या गोडावूनवर रविवारी कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा मारला. यावेळी मोठ्या प्रमाणात बनावट खताचा साठा आढळला. दरम्यान, संयुक्त पथकाने ३२३ बनावट खताचे पोते जप्त केले आहेत. शिवाय, यापूर्वीच अटकेत असलेल्या ‘त्या’ विक्रेत्याची न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
येळनूर येथील खत विक्रेता दिनेश कुलकर्णी या खत विक्रेत्याकडून बनावट खताची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभाग व पोलिसांना होती. या माहितीवरून पोलिसांनी ७ जुलै रोजी अटक केली होती. दरम्यान, रविवारी पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने पुन्हा निलंगा येथील एमआयडीसीत असलेल्या दिनेश कुलकर्णी याच्या गोडावूनवर छापा मारला. यावेळी गोडावूनमध्ये ३२३ बनावट खताचे पोते आढळले. शिवाय, बनावट खत पोत्यांमध्ये पॅकिंग करण्यासाठी जे साहित्य वापरले जात होते, ते साहित्यही पथकाने जप्त केले आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यापूर्वीच कुलकर्णी यास पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी)
संयुक्त पथकाने ३२३ खताचे पोते जप्त केले असून, पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे शिलाई मशीन, कात्री, दोरा, कटर व अन्य कच्चा माल ताब्यात घेतला आहे. निलंगा पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये जप्त करण्यात आलेले साहित्य ठेवण्यात आले आहे.
रविवारी केलेल्या संयुक्त कारवाईत कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, मोहीम अधिकारी महेश क्षीरसागर, औराद पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील रेजितवाड, तालुुका कृषी अधिकारी सतीश देशमुख, नाबदे यांचा समावेश होता.
पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी १० ते ३ या वेळेत येळनूर तसेच कुलकर्णी याच्या निलंगा एमआयडीसी परिसरात असलेल्या गोडावूनची कसून तपासणी केली. त्यात हे साहित्य आढळले आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून कृषी विभागाने यापूर्वी दिनेश कुलकर्णी याने शेतकऱ्यांना विक्री केलेले २१५ पोते यापूर्वीच ताब्यात घेतले होते. या पोत्यांतील खत नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बनावट असल्याचा आल्याने पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने परत रविवारी गोडावूनवरच छापा मारून खताचे पोते ताब्यात घेतले आहेत.
कृषी आणि पोलिस विभागाने यापूर्वी २१५ आणि रविवारी ३२३ असे एकूण ५३८ बनावट खताचे पोते जप्त केले आहेत. अन्य साहित्यही जप्त केले आहेत. आता पोलिस तपासात यापूर्वी कुलकर्णी याने किती पोते खताची विक्री केली आहे, याचा तपास केला जाणार आहे.

Web Title: Fake stocking seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.