- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागात लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार झालेल्या कर्मचारी भरतीमध्ये घोटाळा झाला असून, याप्रकरणी चौकशीअंती निलंबित वरिष्ठ लिपिक अंकुश हिवाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता एस.एस. भगत यांनी कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांना दिले, त्यावरून पवार यांनी चौकशीप्रमुखांना हिवाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले.
बनावट ऑर्डर तयार करून वरिष्ठ अभियंत्यांच्या स्वाक्षऱ्यांनिशी मसुदा तयार करीत ज्येष्ठता यादीत कर्मचाऱ्यांची नावे खाली-वर करून अनेकांना नियुक्ती देण्याचे हे प्रकरण आहे. कट-पेस्ट, मॉर्फिंग करून बनावट ऑर्डर दिल्याचे ‘लोकमत’ने १७ मे रोजी उघडकीस आणले होते. त्यानंतर बांधकाम विभागाच्या ६ सदस्यीय समितीने या प्रकरणात चौकशी केली. उपअभियंता एस.बी. बिऱ्हारे हे समितीचे अध्यक्ष होते, तर उपअभियंता ठाकूर, के. एम. आय. सय्यद, लिपिक कोंडवार, वरिष्ठ लिपिक इधाटे, सदावर्ते हे समिती सदस्य होेते. २०१३ पासून आजपर्यंत भरतीअंतर्गत ज्येष्ठता डावलून आदेश देण्यात आले. यात बनावट आदेश तयार करणे, सेवा ज्येष्ठता यादीत नावे खाली-वर करणे, तसेच जवळच्या नातेवाइकांचे जॉइनिंग ऑर्डर काढल्या गेल्या आहेत. १५ लाख रुपयांमध्ये एक आदेश तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. येथील आस्थापना विभागातून पूर्ण मराठवाड्यात सह्यांचे पत्र कट-पेस्ट, मॉर्फिंग करून बनावट ऑर्डर दिल्यामुळे या विभागात मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पत्रात काय नमूद आहेआस्थापना वरिष्ठ लिपिक अंकुश हिवाळे याने बनावट व खोटे नियुक्ती आदेश तयार केल्याप्रकरणी, तसेच शासनाची फसवणूक करणे, शासन दस्तावेज हेतुपुरस्सर गायब करणे, नावामध्ये बदल करून खाडाखोड करणे, अशा गंभीर सबबीखाली हिवाळे याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता तथा चौकशी समिती प्रमुख एस.बी. बिरारे यांना कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांनी पत्र दिले आहे. दरम्यान, अभियंता पवार यांनी सांगितले की, बिरारे यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र दिले आहे. दुसरीकडे, हिवाळे यास विचारले असता तो म्हणाला, नियुक्तीपत्र मी दिलेले नाही, सगळ्या पत्रांवर वरिष्ठांच्या सह्या आहेत. मी निर्दोष आहे.