बनावट सोने गहाण प्रकरण; मुख्य फरारी आरोपी जेरबंद
By Admin | Updated: June 8, 2017 00:36 IST2017-06-08T00:34:27+5:302017-06-08T00:36:36+5:30
जालना : बहुचर्चित जेपीसी बँकेच्या बदनापूर शाखेत बनावट सोने गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याचे उघडकीस आले होते

बनावट सोने गहाण प्रकरण; मुख्य फरारी आरोपी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बहुचर्चित जेपीसी बँकेच्या बदनापूर शाखेत बनावट सोने गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी मुख्य तीन आरोपींना अटक केली असून, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदनापूर न्यायालयाच्या आदेशाने बदनापूर पोलीस ठाण्यात २०१० ते २० १५ या काळात दरम्यान फसवणूक केल्यासंदर्भात ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होेते. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे देण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींची संख्या व गुन्ह्याचे स्वरुप पाहता, बारी यांनी विशेष पथकास आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने ५ आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मुख्य प्रमुख आरोपी हे गौरव मंत्री, प्रितेश मंत्री व राजकुमार मंत्री असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक धुळे, नाशिक, औरंगाबाद येथे गेले. परंतु आरोपी वास्तव्याची जागा वारंवार बदलत असल्याने व त्यांनी त्यांचे जुने मोबाईल नंबर व जुने अड्रेस बदलल्यामुळे त्यांना पकडने जिकरीचे झाले होते. बुधवारी पोलीस पथकाला त्यांच्या ठावठिकाणीची माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी बारी यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.