डासोत्पत्ती रोखण्यात मनपाला अपयश !
By Admin | Updated: November 7, 2014 00:42 IST2014-11-07T00:30:32+5:302014-11-07T00:42:18+5:30
लातूर : पावसाळ्यात गप्पी मासे सोडले नाहीत की, कोरडा दिवस पाळला नाही. धूर फवारणी तर लांबच. मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती ठिकाणे वाढली आहेत.

डासोत्पत्ती रोखण्यात मनपाला अपयश !
लातूर : पावसाळ्यात गप्पी मासे सोडले नाहीत की, कोरडा दिवस पाळला नाही. धूर फवारणी तर लांबच. मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती ठिकाणे वाढली आहेत. परिणामी, डेंग्यूचा एडिस इजिप्ती डास सक्रिय झाला आहे. त्याच्या दंशामुळे जिल्ह्यातील ५५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, चौघांना या डासाने गिळंकृत केले आहे. तरीही मनपा झोपेतच आहे. ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांपासून आणि यापूर्वीही वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही प्रमाणात झोपलेली मनपा जागी झाली आणि कर्मचाऱ्यांनानोटिसा देण्यात आल्या. मात्र फॉगिंग करून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यात मनपाचे दुर्लक्षच आहे.
लातूर शहरात चारशे ते सव्वाचारशे डासोत्पत्ती ठिकाणे आहेत. जिल्हाभरात सहाशे ते सातशे डासोत्पत्ती ठिकाणे आहेत. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होत आहे. या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात हौदात गप्पी मासे सोडले जातात. तर घरोघरी कोरडा दिवस पाळून डासोत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन संबंधित यंत्रणेला ती नष्ट करण्याबाबत सुचविले जाते. परंतु, गेल्या पावसाळ्यात ना हिवताप कार्यालयाने गप्पी मासे सोडले ना मनपाने डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी मोहीम राबविली. परिणामी, गेल्या दोन महिन्यांपासून डासांचा उद्रेक वाढला आहे. जिल्हाभरात डेंग्यूसदृश रुग्ण सापडत आहेत. जिल्हा हिवताप कार्यालयाने जे अडीच हजार रक्तनमुने प्रयोगशाळेला पाठविले, वर्षभरात ५५ रुग्णांच्या रक्तनमुन्याचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या डेंग्यूच्या तापीने चौघा जणांचा मृत्यू झाला. तरीही मनपा डासोत्पत्ती रोखण्याबाबत पुढे येऊ शकली नाही. हिवताप कार्यालयाने जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतींना डासोत्पत्तीचा उद्रेक कळूनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)
लातूर शहरातील प्रत्येक प्रभागांत सकाळी व संध्याकाळी धूर फवारणी करण्यात येत आहे. मनपाकडे धूर फवारणीचे १३ यंत्र आहेत. या यंत्राद्वारे प्रत्येक प्रभागात धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी एक-एक वॉर्ड धरून फवारणी केली जात आहे. त्यासोबतच अॅबेटिंगही केली जात आहे. पाण्यात औषधी मिसळून डासोत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न मनपाने हाती घेतला आहे. डास वाढणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ५५ जणांना डेंग्यू झाला, तर चौघा जणांचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयांतील अनेक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत. परंतु, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या प्रयोगशाळेतून आलेला अहवालाच ग्राह्य धरल्यामुळे खाजगी रुग्णालयातील रुग्ण संशयित डेंग्यू म्हणूनच ग्राह्य धरले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा उद्रेक सुरू असताना मनपा झोपेत आहे.
४‘लोकमत’मध्ये या डेंग्यूच्या उद्रेकाबाबत वृत्त प्रकाशित होताच लातूर मनपाने १५२ लोकांना नोटिसा पाठविल्या आहेत. एवढीच कारवाई मनपाने केली आहे. अद्याप धूर फवारणी केल्याचे दिसत नाही. तात्पुरते व कायमस्वरूपी डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याबाबत अद्याप उपाययोजना नसल्याने डासांचा उद्रेक सुरू आहे.