फारोळ्यात बिघाड; पाणीपुरवठा विस्कळीत
By Admin | Updated: January 11, 2016 00:07 IST2016-01-11T00:03:11+5:302016-01-11T00:07:43+5:30
औरंगाबाद : दिवसभराच्या शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्ववत होत असतानाच रविवारी पहाटे फारोळा येथील पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

फारोळ्यात बिघाड; पाणीपुरवठा विस्कळीत
औरंगाबाद : दिवसभराच्या शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्ववत होत असतानाच रविवारी पहाटे फारोळा येथील पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दूर करण्यासाठी सातशे मि.मी. व्यासाची एक जलवाहिनी रविवारी तब्बल ११ तास बंद राहिली. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. रविवारीही शहरातील काही वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी १२ तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे शनिवारी शहरात कुठेही पाणीपुरवठा झाला नव्हता. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर शनिवारी रात्री दोन्ही मुख्य जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरातील जलकुंभ भरले जात असताना रविवारी पहाटे फारोळा येथील पंप हाऊसमध्ये बिघाड झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे सातशे मि.मी.च्या जलवाहिनीवर सेन्सर बसविल्याच्या जागेवर मोठी गळती सुरू झाली. त्यामुळे पंप हाऊसमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यानंतर तातडीने मुख्य जलवाहिनीद्वारे होणारा पुरवठा थांबविण्यात आला. जलवाहिनीतील संपूर्ण पाणी बाहेर पडल्यानंतर ही गळती दूर करण्यात आली. त्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ लागला. त्यानंतर पुरवठा पूर्ववत सुरू झाला.