नवरात्रात अनवाणी राहण्याचे ‘फॅड’
By Admin | Updated: September 29, 2014 00:42 IST2014-09-29T00:03:48+5:302014-09-29T00:42:14+5:30
अंबाजोगाई: विज्ञान युगात श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचा प्रत्यय सुरू असलेल्या नवरात्रौ महोत्सवात समोर आला आहे.

नवरात्रात अनवाणी राहण्याचे ‘फॅड’
अंबाजोगाई: विज्ञान युगात श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचा प्रत्यय सुरू असलेल्या नवरात्रौ महोत्सवात समोर आला आहे. युवक व युवती तसेच प्राथमिक शाळेतील बालकेही नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस पादत्राणाचा वापर करायचा नाही हे फॅडच जणु काही पसरल्याने शहरात अनवाणीपणे चालणाऱ्या युवक-युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संगणकीकरण, विज्ञान,तंत्रज्ञान यांचा झपाट्याने होत असलेला प्रसार, भौतिक सुविधांची रेलचेल अशाही स्थितीत श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे वाढत असलेले महत्त्व नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने समोर आले आहे. योगेश्वरी देवीचे नवरात्र सुरू झाल्यानंतर घटस्थापनेपासूनच अनवाणी राहण्याचा संकल्प शहरातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी केला आहे. अनवाणी राहयचे हे फॅड यावर्षीच्या नवरात्रौ मोठ्या प्रमाणात पसरले आहे. येथील शालेय विद्यार्थी मांगल्य मोरोपंत कुलकर्णी याच्याकडे याबाबत विचारणा केली असता मातीत अनवाणीपणे चालल्यास रक्ताभिसरण चांगले होते. अशी प्रतिक्रिया त्याने दिली. विज्ञानाचा आधार त्याने सांगितला. मात्र, शाळेतील अनेक मुली योगेश्वरी देवीसाठी आपण अनवाणी फिरत असल्याचे त्या म्हणाल्या.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. डी. एच. थोरात म्हणाले की, तंत्रशिक्षण घेणारे व विज्ञानाचे पदवीधर विद्यार्थीही अनवाणीपणे फिरत आहेत. या रूढी व अंधश्रद्धेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अनवाणी फिरण्यामुळे पायाला होणाऱ्या जखमा व जंतुसंसर्ग याचा मोठा त्रास काही दिवसानंतर सुरू होतो. असे सांगून समाजात प्रबोधन व उद्बोधन झाल्यासच या प्रथा दूर होतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पूर्वी शहरातील काही ज्येष्ठ मंडळी अथवा महिला या प्रथेचे पालन करीत असत.
मात्र, आता ज्येष्ठांपेक्षा युवक-युवतींनीच या नवरात्रात हे फॅड फॅशन म्हणून रूढ केल्याने अनवाणीपणे चालणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. (वार्ताहर)