धान्य विक्रीसाठी शेतकरी बचत गटांना देणार सुविधा
By Admin | Updated: May 22, 2014 00:33 IST2014-05-22T00:30:14+5:302014-05-22T00:33:20+5:30
परभणी : शेतकरी कष्टाळू व प्रयोगशील असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे.

धान्य विक्रीसाठी शेतकरी बचत गटांना देणार सुविधा
परभणी : शेतकरी कष्टाळू व प्रयोगशील असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. या दृष्टीने शेतकरीगटांना भाजी-पाला, फळे व धान्य विक्रीसाठी कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिले. कृषी व पणन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती मंगल कार्यालयात फळे व धान्य महोत्सवाचे उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक अशोक ढवन, आत्माचे प्रकल्प संचालक अशोकराव काळे, सदस्य बालकिशन चांडक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. के. दिवेकर तसेच कृषी व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करुन उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी गटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंह म्हणाले शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आत्माचा मूळ उद्देश आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कारप्राप्त शेतकर्यांनी आपले प्रयोग व उपक्रम परिसरातील अन्य शेतकर्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. कृषी विद्यापीठाने संशोधनाचाही शेतकर्यांनी लाभ घ्यावा. पारंपारिक पद्धतीने शेती करणे सोडून आधुनिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकर्यांनी एकत्र यावे व आपल्या मालाचे मूल्य ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिवेकर म्हणाले, शेतकरी व ग्राहक यांच्यामधील साखळी कमी करुन शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य मोबदला व ग्राहकांना उच्च प्रतीचे धान्य, फळे रास्तदरात मिळवून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. धान्य महोत्सवात जिल्ह्यातील व राज्यातील कृषी मालावर प्रक्रिया करणारे उत्पादक यांनी प्रक्रिया केलेले उत्पादने देखील विक्रीसाठी ठेवली आहेत. डॉ.अशोक ढवण म्हणाले, शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी घेण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. या महोत्सवाला कायमस्वरुपी जागा मिळणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जागा महोत्सवासाठी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून हा महोत्सव वर्षातून एक वेळा घेण्यापेक्षा तो सातत्याने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आत्माचे सदस्य बालकिशन चांडक म्हणाले, चार-पाच वर्षांपासून बंद पडलेला हा उपक्रम जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. शेतकर्यांच्या दृष्टीने ही बाब फार महत्त्वपूर्ण आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या श्रमाचे मोल केले जाते. त्यांच्या मालाला याच ठिकाणी योग्य भाव मिळू शकतो. त्यामुळे हा महोत्सव शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात प्रगतीशील शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. या शेतकर्यांतर्फे मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब जामगे म्हणाले, माझ्या शेतात पपईचे उत्पादन घेतले जाते. ही पपई व्यापार्यांमार्फत विक्री करण्यासाठी नेली जात असताना कडती घेतली जाते. ही कडती का द्यायची, असा सवाल उपस्थित करीत कडती बंद व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तर एकनाथराव साळवे यांनी आपल्या मनोगतात शेतकर्यांच्या माल विक्री करण्यासाठी कायमस्वरुपी ठिकाण उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)