जळीतांच्या चेहऱ्यावर त्यांनी पाहिले नवे तेज
By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:10:24+5:302014-06-30T00:37:41+5:30
पंकज जैस्वाल , लातूर लोखंडाला परीस लागला की त्याचे सोने होते़ अशाच पध्दतीने डॉक्टरांच्या परीस स्पर्शाने उपेक्षीत जळीत रूग्णांची काया सोन्यासारखी उजळून निघाली़

जळीतांच्या चेहऱ्यावर त्यांनी पाहिले नवे तेज
पंकज जैस्वाल , लातूर
लोखंडाला परीस लागला की त्याचे सोने होते़ अशाच पध्दतीने डॉक्टरांच्या परीस स्पर्शाने उपेक्षीत जळीत रूग्णांची काया सोन्यासारखी उजळून निघाली़ उपचारानंतर या ४० रूग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य व नवे तेज पाहून लातूरच्या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांच्या कार्याचेही सार्थक झाल्याचे समाधान मिळाले़
शनिवारी व रविवारी या दोन्ही सुट्टीच्या दिवशी तज्ञ डॉक्टरांनी सामूहिकरित्या आपला संपूर्ण वेळ जळीत रूग्णांचे शल्य दूर करण्यासाठी विना मोबदला देवून सामाजीक आरोग्याच्या यज्ञात आपली समीधा टाकली़ रुग्ण जळाल्यानंतर त्यांचे आखडलेले सांधे मोकळे करण्याची अवघड शस्त्रक्रिया या तज्ञांनी केली़ शारीरीक व्यंग दूर करीत अनेकांचे जळालेले अवयव दुरूस्त केले़ त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ़दिप्ती डोणगावकर, औरंगाबाद येथील प्रसिध्द प्लास्टीक सर्जन डॉ़अविनाश येळीकर, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ़श्रीकांत गोरे, डॉ़जी़एल़अनमोड, डॉ़अजीत जगताप, डॉ़सतिष देशपांडे, डॉग़णेश स्वामी, डॉ़गिरीष ठाकूर, डॉ़हाके पाटील यांच्यासह भूलतज्ञ, निवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा ताफा अगदी सुट्टीच्या दिवशीही मोठ्या उत्साहाने मोफत शस्त्रक्रियांच्या कामी सहभागी झाला होता़
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रूग्णालय तसेच पुण्यश्लोक चॅरिटेबल ट्रस्ट गोरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ जून या कालावधीत जळीत रूग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ त्यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांनी पुढाकार घेतल्याचे डॉ़ श्रीकांत गोरे म्हणाले़ शनिवारी २२ तर रविवारी १८ जणांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या़ तसेच तिघांना पुढील उपचाराचा सल्ला दिला़
जीवनदायी योजनेचाही लाभ़़़़
शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ या जळीत रूग्णांपैकी अनेकांना झाला असल्याची माहिती डॉ़आनंद बारगले यांनी दिली़
यापूर्वी मुरूड, देवणी, कवठाळा, हेर, उस्मानाबाद येथे झालेल्या शिबीरातही अनेकांना जीवनदायी योजनेचा लाभ मिळाला आहे़
गेल्या दोन महिन्यात ४०० गावे फिरून १०२ जळीत रूग्णांची तपासणी केल्यानंतर ४३ रूग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड केल्याची माहिती डॉ़श्रीकांत गोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली़