हिंंगोली- कनेरगाव रस्त्यासाठी केंद्राकडे डोळे
By Admin | Updated: July 20, 2014 00:26 IST2014-07-19T23:49:58+5:302014-07-20T00:26:12+5:30
हिंगोली : नांदेड ते अकोला हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्याने हिंगोली ते कनेरगावनाका या रस्त्याचे काम राज्य शासनाच्या अखत्यारित राहिलेले नाही.

हिंंगोली- कनेरगाव रस्त्यासाठी केंद्राकडे डोळे
हिंगोली : नांदेड ते अकोला हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्याने हिंगोली ते कनेरगावनाका या रस्त्याचे काम राज्य शासनाच्या अखत्यारित राहिलेले नाही. त्यामुळे आता हा रस्ता तयार होण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली ते कनेरगावनाका या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे कनेरगावनाका येथील अनेक ग्रामस्थ हिंगोलीकडे वाहनाने येण्याऐवजी रेल्वेनेच येणे पंसत करीत आहेत. हा रस्ता राज्य शासनाकडून होईल, अशी अपेक्षा असताना केंद्र शासनाने नांदेड ते अकोला हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून काही महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार राजपत्रही प्रसिद्ध झाले. त्यामुळे आता हा रस्ता केंद्र शासनाच्या अखत्यारित आला आहे. परिणामी या रस्त्यासाठी राज्य शासनाला निधी देता येणार नाही. आता हा महामार्ग तयार करण्यासाठी केंद्र शासनानेच सकारात्मक भूमिका घेवून महामार्गाचे काम सुरू करणे आवश्यक आहे.
भाजपाचे नेते गोवर्धन वीरकुंवर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी गडकरी यांनी यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता केंद्र शासनाकडून या महामार्गासंदर्भात कधी निर्णय होईल? याकडेच जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)