भोनगिरी येथे अतिसाराचा उद्रेक
By Admin | Updated: July 21, 2014 00:23 IST2014-07-20T23:40:55+5:302014-07-21T00:23:37+5:30
भूम : तालुक्यातील भोनगिरी येथे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने अतिसाराची साथ पसरली आहे.

भोनगिरी येथे अतिसाराचा उद्रेक
भूम : तालुक्यातील भोनगिरी येथे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने अतिसाराची साथ पसरली आहे. ३७ जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गावामध्येच उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भोनगिरी येथील ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा झाला. त्यामुळे १८ जुलैपासून येथील ग्रामस्थांना अतिसाराच्या साथीने त्रस्त झाले आहेत. १९ जुलै रोजी येथील जिल्हा परिषद शाळेत पथकाने ९३ जणांची तपासणी केली. यावेळी ३४ जणांना अतिसाराची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर २० जुलै रोजीही १८ जणांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीदरम्यान तीन जणांना अतिसाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३७ वर जावून ठेपला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही अतिसाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी एम.एस. सलगर, आरोग्य सेविका ठोकळ यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ग्रामसेवकही तळ ठोकून आहेत. (वार्ताहर)
अशुद्ध पाणीपुरवठा
गावाला अशुद्ध पाणीपुरवठा झाल्यामुळेच अतिसाराची लागण झाल्याचे येथील काही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करताना काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने झाली आहे.
पाण्याच्या टाकीची साफसफाई
अतिसाराची साथ पसरल्यानंतर ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या टाकीची साफसफाई केली आहे. तसेच ब्लिचींग पावडरही टाकण्यात आली आहे. यासोबतच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्य उपाययोजनाही केल्याचे वैद्यकीय अधिकारी एस.आर. खराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.