दोन हजार घरांना हद्दवाढीचा लाभ
By Admin | Updated: August 15, 2014 01:36 IST2014-08-15T01:27:58+5:302014-08-15T01:36:38+5:30
भूम : सुमारे पाच वर्षांपूर्वी दाखल केलेला शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला असून, यामुळे सद्यस्थितीत दोन हजार घरांना याचा फायदा होणार असल्याची माहिती

दोन हजार घरांना हद्दवाढीचा लाभ
भूम : सुमारे पाच वर्षांपूर्वी दाखल केलेला शहर हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला असून, यामुळे सद्यस्थितीत दोन हजार घरांना याचा फायदा होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिली.
नगर पालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गाढवे म्हणाल्या, हद्दवाढ भागातील रहिवाशांना पालिकेच्या वतीने कुठल्याही सुविधांची कमतरता पडू देणार नाही. पालिकेने प्रारंभी १९९४ मध्ये हद्दवाढीसाठी प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, त्यावेळी तो तांत्रिक त्रुटींमुळे मंजूर होऊ शकला नाही. यानंतर २००८-०९ मध्ये पुन्हा सुधारित प्रस्ताव दाखल केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. सदरची हद्दवाढ ही महसुली हद्दवाढीनुसार झाली असून, यामुळे सध्या दोन हजार घरांना याचा फायदा होणार आहे. शिवाय पालिकेचे उत्पन्नही दहा ते पंधरा लाखांनी वाढणार असल्याचे गाढवे यावेळी म्हणाल्या.
यावेळी हद्दवाढ प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल पेढे वाटून व आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गटनेते संजय गाढवे, उपनगराध्यक्ष सचिन मोटे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत पाटुळे, फेडरेशनचे संचालक गौरीशंकर साठे, नगरसेवक श्रीराम मुळे, महादेव गायकवाड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)