अतिरिक्त शिक्षक तीन महिन्यांपासून वेतनाविना
By Admin | Updated: March 12, 2017 23:16 IST2017-03-12T23:16:09+5:302017-03-12T23:16:46+5:30
लातूर : अतिरिक्त ठरलेल्या काही शिक्षकांचे ‘आॅनलाईन’ पद्धतीने अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये समायोजन झाले असले, तरी प्रत्यक्षात या संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांना रूजूच करून घेतले नाही.

अतिरिक्त शिक्षक तीन महिन्यांपासून वेतनाविना
लातूर : अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या काही माध्यमिक शिक्षकांचे ‘आॅनलाईन’ पद्धतीने अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये समायोजन झाले असले, तरी प्रत्यक्षात या संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांना रूजूच करून घेतले नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ५३ अतिरिक्त शिक्षकांचे वेतन रखडले आहे. वेतनासाठी अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांची धावाधाव सुरू आहे.
शासनाच्या वतीने दरवर्षीच्या ३० सप्टेंबर रोजी अनुदानित माध्यमिक शाळांतील विद्यार्थी संख्या पाहून त्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांची संख्या निश्चित केली जाते़ त्यास संचमान्यता असे संबोधले जाते़ या संचमान्यतेनुसार ३० विद्यार्थी संख्या असलेल्या तुकडीस एक शिक्षक असणे बंधनकारक आहे़ इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या इयत्तेसाठी हा नियम आहे़ तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गात ३५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आणि इयत्ता नववी व दहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील ४० विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक असा नियम आहे़ शासनाच्या या धोरणानुसार सन २०१५-१६ या वर्षासाठी संचमान्यता झाली होती़ त्यात जिल्ह्यात १९० शिक्षक अतिरिक्त ठरले़
जिल्ह्यात अनुदानित शाळांची संख्या ४५७ अशी आहे़ या अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या १९० पैकी ७३ शिक्षकांचे आॅनलाईन पध्दतीने ज्या विद्यार्थी संख्येनुसार शाळेवर कमी शिक्षक आहेत, तिथे त्यांचे समायोजन करण्यात आले़ तसेच ज्या माध्यमिक शाळांवरील शिक्षक सेवानिवृत्त झाले अशा ठिकाणी २० शिक्षकांचे समायोजन झाले़ उर्वरित ५३ शिक्षकांचा समायोजनाचा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याचे दिसून येते़
दरम्यान, या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पूर्वीच्या शाळेच्या ठिकाणहून मासिक वेतन देण्यात येत होते़
परंतु, डिसेंबरपासून या शिक्षकांचे वेतनच बंद झाले आहे़ विशेष म्हणजे, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांचेही वेतन देण्यात आले नाही़ तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत़ दरम्यान, आॅनलाईनपध्दतीने जिथे समायोजन झाले त्या संस्थेचे मुख्याध्यापक त्यांना रुजू करुन घेण्यास तयार नाहीत़