जंगल सफारी पार्कच्या अतिरक्त जागा, निधीचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:04 IST2021-07-14T04:04:57+5:302021-07-14T04:04:57+5:30
मुख्यमंत्री : प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे औरंगाबाद : महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मिटमिटा येथे उभारण्यात येणाऱ्या जंगल ...

जंगल सफारी पार्कच्या अतिरक्त जागा, निधीचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवा
मुख्यमंत्री : प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे
औरंगाबाद : महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मिटमिटा येथे उभारण्यात येणाऱ्या जंगल सफारी पार्कसाठी लागणारी अतिरिक्त जागा, निधीसाठी परिपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मनपा प्रशासनाला दिले.
वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय उपस्थित होते.
शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना वेरूळ, अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटनस्थळेही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत, हे विचारात घेऊन मिटमिटा येथील नियोजित जंगल सफारी पार्कचे काम झाले पाहिजे. औरंगाबादमध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान १४ एकर जागेवर आहे. त्यातील काही जागा प्राणीसंग्रहालयाला दिली आहे. हे मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे. येथे ससे, नीलगाय, हरिण, मोर, कोल्हे, लांडगे, तरस, सिंह, अस्वल, वाघ, आदी अडीचशे वन्यजीव आहेत. या प्राणीसंग्रहालयाला जागा कमी पडत असल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरणाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी व मानकानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे ४० हेक्टरवर प्राणीसंग्रहालयाचे काम सुरू आहे. या प्राणीसंग्रहालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागा लागणार असल्याने त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्राण्यांना नैसर्गिक वातावरण, मोठी जागा हवी
महापालिका अत्यंत कमी जागेत प्राणीसंग्रहालय चालवत आहे. प्राण्यांना मोठी जागा हवी, नैसर्गिक वातावरण हवे म्हणून दोन वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी रद्द केली होती. प्राणीसंग्रहालय लवकरच मिटमिट्यात शिफ्ट करण्याच्या अटीवर तात्पुरती परवानगी बहाल केली आहे. स्मार्ट सिटीतील ११ कोटी रुपये खर्च करून मिटमिट्यातील नियोजित जागेवर संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. २५० कोटींची आर्थिक तरतूद स्मार्ट सिटीने जंगल सफारी पार्कसाठी केली आहे.