पीएच.डी., एमफीलच्या ‘सबमिशन’साठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST2021-05-15T04:04:52+5:302021-05-15T04:04:52+5:30
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालये, प्रयोगशाळा, ग्रंथालये, मार्गदर्शकांना प्रत्यक्ष भेटणे बंद झाल्यामुळे पीएच.डी., एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना अंतिम शोधप्रबंध तयार करण्यासाठी ...

पीएच.डी., एमफीलच्या ‘सबमिशन’साठी मुदतवाढ
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालये, प्रयोगशाळा, ग्रंथालये, मार्गदर्शकांना प्रत्यक्ष भेटणे बंद झाल्यामुळे पीएच.डी., एम.फिल.च्या विद्यार्थ्यांना अंतिम शोधप्रबंध तयार करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तथापि, ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार एमफीलच्या शोधप्रबंध ‘सबमिशन’साठी २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याप्रमाणे पीएच.डी.च्या ‘सबमिशन’साठीदेखील मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये, तर यंदा एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागला. त्यामुळे एम.फिल.चा कालावधी पूर्ण होत आलेल्या विद्यार्थ्यांना शोधप्रबंध करण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठांना अशा विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विद्यापीठाने २१ जूनपर्यंत एम.फिल.च्या शोधप्रबंध सादरीकरणासाठी मुदतवाढ दिली आहे.
तथापि, नियमित पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम शोधप्रबंध सादर करण्याची तीन वर्षांची अट आहे. तथापि, ज्या विद्यार्थ्यांचे विहित कालावधीत संशोधन पूर्ण झाले नाही अशा विद्यार्थ्यांना दीड हजार रुपयांचे शुल्क भरुन पुनर्प्रवेश घ्यावा लागतो. मात्र, गेल्या वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे याही विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी अनेक अडचणी येत असून ते विहित कालावधीत शोधप्रबंध पूर्ण करु शकले नाहीत. यासंदर्भात ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक सूचना नसल्या तरी विद्यापीठाने पीएच.डी.साठीदेखील एम.फिल. प्रमाणे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना या विभागाकडे अर्ज करावा लागणार असल्याचे डॉ. मंझा यांनी सांगितले.
चौकट....
पीएच.डी. प्रवेशाचा गुंता सुटेना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सन २०१७ नंतर यंदा ‘पेट’चे आयोजन केले. पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेत (पेट) सुमारे ४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, मागील दोन महिन्यांपासून सेट, नेट आणि पेट उत्तीर्ण विद्यार्थी संशोधन प्रक्रियेपासून अधांतरीच आहेत. गाईडची संख्या व विषयनिहाय रिक्त जागा जाहीर केल्यानंतर पीएच.डी. प्रवेशाची लिंक ओपन केली जाईल, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. दुसरीकडे आता अधिष्ठाता मंडळ व संशोधन अधिमान्यता समितीच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात येत आहे.