‘एनआरएचएम’च्या सव्वाचारशे कर्मचाऱ्यांना मिळाली मुदतवाढ
By Admin | Updated: April 2, 2017 00:15 IST2017-04-02T00:11:15+5:302017-04-02T00:15:02+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी यासाठी मागील वर्षभरात अनेकवेळा आंदोलने केली

‘एनआरएचएम’च्या सव्वाचारशे कर्मचाऱ्यांना मिळाली मुदतवाढ
उस्मानाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी यासाठी मागील वर्षभरात अनेकवेळा आंदोलने केली. शासनाकडूनही त्या-त्यावेळी दिलासादायक आश्वासने दिली गेली; मात्र या कर्मचाऱ्यांची पुन्हा ११ महिन्यांच्या मुदतवाढीवर बोलवण करण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षभर उपरोक्त मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सेवा पुरविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेविका, फार्मासिस्ट आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून हे कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, ‘एनआरएचएम’मधील सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी मागील वर्षभरात कर्मचाऱ्यांनी विविध स्वरुपाची आंदोलने केली. शासनस्तरावरही संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. यावेळी संबंधित खात्यांच्या प्रमुखांशी चर्चेची गुऱ्हाळेही रंगली. त्या-त्यावेळी कर्मचाऱ्यांना दिलासादायक तोंडी आश्वासने दिली गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या.
असे असतानाच शासनाने कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी सामावून न घेता पुन्हा मुदतवाढीवर बोलवण केली आहे. त्यांना ११ महिन्यांच्या आॅर्डर दिल्या जाणार आहेत. शासनाच्या या भूमिकेमुळे ‘एनआरएचएम’मधील संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पहावयास मिळते. (प्रतिनिधी)