सरकारविरोधी आक्रोश मतपेटीपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: January 28, 2017 00:51 IST2017-01-28T00:49:50+5:302017-01-28T00:51:47+5:30
लातूर : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत.

सरकारविरोधी आक्रोश मतपेटीपर्यंत पोहोचवा
लातूर : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत. शेतकरी आणि शेतमजूर कंटाळून संघर्षाच्या पवित्र्यात आले आहेत़ या सर्वांचा आक्रोश एकत्र करून युती सरकारला घालविण्याचा निर्धार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून करावा, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले़ तर अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, ‘पालकमंत्र्यांची काळजी करू नका, त्यांना मी निलंग्यातच अडवून ठेवतो, त्यांचा वकूब जिल्ह्याच्या नेतृत्वाचा नाही. त्यामुळे लातूरकरांनी पालकमंत्र्यांची काळजी करण्याचे कारण नाही.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी आ़ अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़ प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, माजी आ़ शिवाजीराव पाटील, वैजनाथ शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, शैलेश पाटील चाकूरकर, धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख, श्रीपतराव काकडे, अॅड.व्यंकट बेद्रे, सुनीता आरळीकर यांची उपस्थिती होती.
यावेळी आ़ दिलीपराव म्हणाले, काही संधीसाधू लोकांनी पक्षांतर केले असले तरीही गोंधळून जाण्याचे कारण नाही. जे गेले ते आपले कधीच नव्हते, त्यांच्या जाण्याने पक्ष अधिक स्वच्छ झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना कर्तृत्व दाखविण्याची नामी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. नोटबंदी हा तर सरकारचा रिकामटेकडा उद्योग आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. आठवडी बाजार, बैल बाजार चलन तुटवड्याने बंद पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)