एमआयएम शहराध्यक्षांची तडकाफडकी हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:14 IST2017-01-17T00:11:19+5:302017-01-17T00:14:02+5:30
बीड : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शेख मोईन यांनीच ‘डिलींग’चा मार्ग दाखवून पाठिंब्याचे ‘रेट’ ठरविले होते... असा गौप्यस्फोट करणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

एमआयएम शहराध्यक्षांची तडकाफडकी हकालपट्टी
बीड : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शेख मोईन यांनीच ‘डिलींग’चा मार्ग दाखवून पाठिंब्याचे ‘रेट’ ठरविले होते... असा गौप्यस्फोट करणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रिस हाश्मी यांना सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष मोईन यांनी त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली.
येथील पालिकेत एमआयएमचे ९ नगरसेवक पहिल्याच प्रयत्नात निवडून आले आहेत. मात्र, पाठिंबा देण्यावरुन दुफळी निर्माण झाली आहे. सात सदस्यांनी वेगळा गट स्थापन करुन पक्षाला उघड आव्हान दिले. यासंदर्भात रविवारी आ. इम्तियाज जलील यांनी बीडमध्ये येऊन फुटीर नगरसेवकांना गद्दारी केल्यास गय नाही, अशा शब्दांत फटकारले होते. यावेळी त्यांनी शहराध्यक्ष डॉ. हाश्मी यांच्या कार्यालयास भेट देऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. डॉ. हाश्मी यांनी प्रदेशाध्यक्षांनीच दोन्ही क्षीरसागरांकडून पाठिंब्यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करण्यास सांगितले, असा खळबळजनक आरोप केला होता. शिवाय आमच्यावर विकले गेल्याचा आरोप केला जातो; मात्र ज्यांनी हा सल्ला दिला, त्या प्रदेशाध्यक्षांना पक्ष का हटवीत नाही, असा सवालही उपस्थित केला होता. त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आमदारासमोरच शहराध्यक्षांनी पक्षाचे वाभाडे काढल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची पक्षाने गंभीर दखल घेत शहराध्यक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला. पक्षविरोधी वक्तव्य करुन समाजात पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत डॉ. हाश्मी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होता. (प्रतिनिधी)