‘एक्स्प्रेस वे’ झाला खडतर
By Admin | Updated: August 2, 2014 01:44 IST2014-08-02T01:23:06+5:302014-08-02T01:44:37+5:30
नजीर शेख, औरंगाबाद नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा जानेवारी १९९९ मध्ये मंजूर झालेला राष्ट्रीय दर्जाचा एक्स्प्रेस रस्ता पंधरा वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही.

‘एक्स्प्रेस वे’ झाला खडतर
नजीर शेख, औरंगाबाद
नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा जानेवारी १९९९ मध्ये मंजूर झालेला राष्ट्रीय दर्जाचा एक्स्प्रेस रस्ता पंधरा वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही. रस्त्याचे काम करण्याची गती पाहता आणखी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. एखादे काम पंधरा वर्षांनंतरही पूर्ण न होणे यातून राज्याच्या रस्ते विकासाची दशा आणि दिशा स्पष्ट होत आहे.
नागपूर ते मुंबई हे अंतर कमी करण्याच्या हेतूने तसेच नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून नागपूर- औरंगाबाद- मुंबई हा ‘एक्स्प्रेस वे’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाची सुरुवातही मोठा गाजावाजा करून झाली.
नागपूर ते मुंबई अंतर ५० कि. मी. ने कमी करण्याचे उद्दिष्ट या रस्त्याची योजना मार्गी लावताना ठेवण्यात आले. १९९९ मध्ये या रस्ते कामाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम २००२ मध्ये सुरू
झाले.
२०१५ अखेर हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र २०१४ पर्यंत केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे २०१५ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची खात्री देता येत नाही. चौपदरी पूर्ण रस्ता केव्हा होणार याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देता येत नाही. अजून तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल, असे औरंगाबादमधील राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे
आहे. राज्य रस्ते महामंडळाची उदासीनता आणि राजकीय व वाहतूक क्षेत्राकडून आग्रह न झाल्याने या रस्त्याच्या कामाचा पुरता बोऱ्या वाजला आहे.
राज्याच्या तीन महत्त्वाच्या शहरांसह मराठवाडा तसेच विदर्भाला मुंबईशी वेगाने जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने मराठवाडा आणि विदर्भावर अन्यायच झाला आहे.
नागपूर ते बुटीबोरी, जालना ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते लासूर स्टेशन या तीन टप्प्यांचेच फक्त चौपदरीकरण झाले आहे. इतर ठिकाणी हा रस्ता दुहेरीच आहे. अनेक ठिकाणी छोट्या छोट्या पुलांची कामे बाकी आहेत. विदर्भातील कारंजा, सिंदखेडराजा आणि मराठवाड्यातील वैजापूर या परिसरात हा रस्ता अनेक कि. मी. अजूनही एकेरीच आहे. असे असूनही या रस्त्यावर शहर विकासाच्या नावावर टोल सुरू करून राज्य शासनाने एकप्रकारे जनतेची लूटच चालविल्याचा हा प्रकार आहे.
दोन तासांचा अवधी कमी होणार
नागपूर ते मुंबई असा हा मार्ग राज्याच्या १२ जिल्ह्यांतून जातो. हा राज्यमार्गच आहे; परंतु याचा दर्जा राष्ट्रीय महामार्गाचा आहे. नागपूर - मुंबई हे अंतर ५० कि. मी. ने कमी होणार असले तरी हा रस्ता चौपदरी (फोर लेन) असल्याने वाहनांना वेगाने अंतर कापणे शक्य होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पेक्षा या रस्त्याने सुमारे दोन तासांचा अवधी कमी लागणार आहे. मात्र, हा उद्देश अद्यापपर्यंत सफल झालेला नाही.
१९९८ साली राज्य रस्ते महामंडळाने ‘मुंबई - पुणे या एक्स्प्रेस वे’ चे घेतलेले काम २००२ साली पूर्ण झाले.
याठिकाणी वेगाने काम झाले. २००५ साली ‘मुंबई - नाशिक या एक्स्प्रेस वे’ चे काम सुरू होऊन व दोन वेळा मुदतवाढ मिळूनही २०१३ साली जवळपास पूर्ण झाले.
या दोन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण पाहता या रस्त्यांचे काम वेगाने होणे गरजेचे होते. असे असले तरी राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या (सुमारे ७०० कि. मी.) आणि मराठवाडा (१६० कि. मी.) व विदर्भातून (४०० कि. मी.) जाणाऱ्या मार्गाबाबत प्रशासकीय यंत्रणेसह सगळीकडेच उदासीनता असल्याने या रस्त्याचे काम पंधरा वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकले नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी यासाठी जमिनी दिल्या त्यांची फसवणूक झाली आहे.
असा आहे मार्ग-
नागपूर- बुटीबोरी, वर्धा, पुलगाव, कारंजा (लाड), जालना, औरंगाबाद, वैजापूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी आणि पुढे कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला मिळतो) मुंबई.
कोणाला फायदा?
या ‘एक्स्प्रेस वे’चा बुटीबोरी, वर्धा, जालना, शेंद्रा, वाळूज, सिन्नर या औद्योगिक वसाहतींना फायदा होणार आहे.
याशिवाय सेवाग्राम, लोणार, सिंदखेडराजा, वेरूळ, शिर्डी या धार्मिक आणि पर्यटन केंद्रांनाही याचा फायदा होणार आहे.
मात्र, हा रस्ताच अद्याप पूर्ण न झाल्याने या औद्योगिक वसाहती व पर्यटन केंद्रांना याचा फायदा मिळालेला नाही.