एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव
By Admin | Updated: June 8, 2014 00:57 IST2014-06-08T00:51:23+5:302014-06-08T00:57:12+5:30
संजय कुलकर्णी , जालना अंबड तालुक्यातील आपेगाव येथे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेली ‘मिनरल वॉटर’ योजना केवळ कमी वीज दाबामुळे बंद आहे.

एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव
संजय कुलकर्णी , जालना
अंबड तालुक्यातील आपेगाव येथे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेली ‘मिनरल वॉटर’ योजना केवळ कमी वीज दाबामुळे बंद आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’च्या २९ जूनच्या अंकातून प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणेने तात्काळ सदर योजनेसाठी एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
या गावातील सर्वच विहिरींचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागत होते. परिणामी, जलजन्य आजार मोठ्या प्रमाणावर पसरत होते. मात्र जिल्हा परिषदेने या गावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्याचा निर्णय ग्रामसभेच्या संमतीने घेतला. त्यासाठी वॉटर लाईफ इंडिया प्रा.लि. सिकंदराबाद या एजन्सीमार्फत प्रायोगिक तत्त्वावर गुणवत्ता बाधित आपेगावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले. त्यावर १६ लाख २१ हजार ७६५ रुपयांचा खर्चही करण्यात आला. जानेवारी २०१३ पासून ही योजना गावात सुरू झाली खरी; परंतु ती दोन-तीन दिवसांतच बंद पडली. विजेचा दाब कमी असल्याने ही योजना बंद पडलेली आहे. सदर योजनेसाठी स्वतंत्र रोहित्र किंवा एक्स्प्रेस फिडरची गरज असल्याचे ‘लोकमत’ च्या वृत्तातून नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, या वृत्तानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरसाठी २.९० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे.
याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सदर प्रस्तावास मंजुरीसाठी तो तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहे.
गावातील कुटुंबियांना प्रतिव्यक्ती याप्रमाणे जेवढे पाणी लागेल, त्यांनी ते योजनेच्या ठिकाणावरून घेऊन जायचे. ३ रुपयांमध्ये २० लिटर पाणी याप्रमाणे ‘मिनरल वॉटर’ चे दर ठरविण्यात आले. योजनेसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने करायची. तर १० वर्षांसाठी देखभाल दुरूस्ती सदर एजन्सीने करावी, असे यासंबंधी झालेल्या कराराद्वारे ठरविण्यात आले.