९ लाख पळविल्याचे उघड
By Admin | Updated: November 6, 2016 00:53 IST2016-11-06T00:34:59+5:302016-11-06T00:53:54+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून पर्यटनासाठी गेलेल्या त्या उद्योजकाच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम

९ लाख पळविल्याचे उघड
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून पर्यटनासाठी गेलेल्या त्या उद्योजकाच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा जवळपास सव्वानऊ लाखांचा ऐवज लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
सचिन अशोक सेठ (रा. तापडिया इस्टेट बी-५) यांचा बंगला चोरट्यांनी फोडल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली होती. बंगल्यातून लाखो रुपयांचा ऐवज चोरी गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
शुक्रवारी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर सचिन सेठ यांनी बंगल्याची पाहणी केली असता त्यांना घरातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच चांगलाच धक्का बसला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी नगर रोडवरील एक पेट्रोलपंपही भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला असून, त्यांचा स्वत:चा उद्योगही असल्यामुळे कुणी तरी जवळच्या व्यक्तीने पाळत ठेवून चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सव्वानऊ लाखांचा ऐवज लांबविला
चोरट्यांनी बंगल्यामधील चार कपाटांचे लॉकर उघडून आतमध्ये असलेला किमती ऐवज, रोख रकमेवर हात साफ केला होता. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी कपाटातील लॉकर गायब केले असून, या लॉकरमध्ये सचिन सेठ यांच्या पत्नीचे दागिने घेऊन पसार झाले.
यात साडेपाच तोळ्यांच्या सहा सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, अडीच तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, चार तोळ्यांच्या चार सोन्याच्या चेन, एक तोळ्याचे सोन्याचे दोन पॅण्डल, एक तोळ्याचे ८ कर्णफुले, ५ ग्रॅमची सोन्याची चेन व पॅण्डल, असे जवळपास २० तोळे व २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत. याचबरोबर घर खर्चासाठी कपाटात ठेवलेले रोख ५० हजार, कुटुंबातील सदस्यांनी बचत करून ठेवलेले रोख २ लाख रुपये, अपार्टमेंटच्या भाडेकरूंनी जमा केलेले १ लाख २५ हजार रुपये, कंपनीच्या व्यवसायाचे १ लाख ५० हजार रुपये, एक मोबाईल तसेच ३ हजार रुपये किमतीच्या दोन मनगटी घड्याळी, असा एकूण ९ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार सचिन सेठ यांनी ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव हे करीत आहेत.