तिन्ही नगराध्यक्षांचा कालावधी संपुष्टात
By Admin | Updated: July 6, 2014 00:16 IST2014-07-06T00:03:52+5:302014-07-06T00:16:08+5:30
हिंगोली : राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांना १० जूनच्या आदेशान्वये दिलेली ६ जूनची मुदतवाढ २ जुलैच्या बैठकीत रद्द केल्यानंतर ३ जुलै रोजी

तिन्ही नगराध्यक्षांचा कालावधी संपुष्टात
हिंगोली : राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व नगरपालिकांमधील नगराध्यक्षांना १० जूनच्या आदेशान्वये दिलेली ६ जूनची मुदतवाढ २ जुलैच्या बैठकीत रद्द केल्यानंतर ३ जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व नगरपालिकांच्या अध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आला. त्यामुळे या नगरपालिकांवर आता जिल्हा प्रशासनाला प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार आहे.
राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा कालावधी ३० जून रोजी संपणार होता; परंतु राज्य मंत्रिमंडळाने १० जून रोजी घेतलेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करून मावळत्या नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर २ जुलै रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांना मुदतवाढ देणारा १० जूनच्या बैठकीतील निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ३ जुलै रोजी राज्याच्या नगरविकास विभागाचे उपसचिव जे.एन. पाटील यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार मावळत्या नगराध्यक्षांचा कालावधी ५ जुलै रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत नगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचनेतील काही मुद्यांसदर्भात जिल्हा प्रशासनास संभ्रम वाटल्याने प्रशासक नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला नाही; परंतु दोन दिवसांमध्ये यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. त्यामुळे कदाचित सोमवारपासूनच तिन्ही नगर पालिकांवर प्रशासकाची नियुक्ती केली जाऊ शकते. (जिल्हा प्रतिनिधी)
नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय २ जुलैच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आल्यानंतर ३ जुलै रोजी प्रसिद्ध झाली अधिसुचना.
५ जुलै रोजी राज्यातील सर्व नगरपालिकांमधील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा कालावधी आला संपुष्टात.
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिकांवर प्रशासक नेमण्यासंदर्भात सोमवारपर्यंत निर्णय होणार.
येत्या २० दिवसांत नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया तिन्ही पालिकांमध्ये पूर्ण होणार.
हिंगोलीत अनिता सूर्यतळ यांना संधी?
हिंगोली येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिजामातानगर भागातील न.प.सदस्या अनिता सूर्यतळ या एकमेव उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडे रिसाला बाजार भागातील सदस्या आशाताई उबाळे या प्रमुख उमेदवार असणार आहेत. असे असले तरी हिंगोली नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असल्यामुळे अनिता सूर्यतळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीत मावळते नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांचीच भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.
वसमतमध्ये शिवसेना-भाजपात चुरस
वसमत नगरपालिकेत शिवसेना-भाजपाचे बहुमत आहे. येथील नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये हे पद मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा होणार आहे. युतीतील सत्ता वाटपानुसार पहिले एक वर्षे शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळाले. त्यानंतर दीड वर्षे भाजपाचा नगराध्यक्ष झाला. आता या नगराध्यक्षांचा कालावधी संपला आहे. पुढील १ वर्षे पुन्हा भाजपा आणि त्यानंतर शेवटचे दीड वर्षे शिवसेनेचा नगराध्यक्ष असे महायुतीत सत्तावाटप झाले होते; परंतु विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व लोकसभेत वसमत शहरात शिवसेनेची कमी झालेली आघाडी पाहून नगराध्यक्षपद शिवसेनेला देण्यात यावे, अशी मागणी या पक्षातील सदस्य करीत आहेत. त्यामुळे या मागणीला भाजपाचे नेते प्रतिसाद देतात की खो देतात? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. वसमत पालिकेत शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाकडून शिवदास बोड्डेवार व राष्ट्रवादीकडून शशिकुमार कुल्थे हे नगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत. असे असले तरी येथे शिवसेनेचे माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा ठरवितील तोच न.प.सदस्य नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
कळमनुरीत सातव ठरवितील तोच नगराध्यक्ष
कळमनुरी नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या पालिकेत खा. राजीव सातव ठरवितील तोच सदस्य नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. सद्य:स्थितीत पालिकेत काँग्रेसच्या यास्मीनबी फारूख बागवान, जैनबी अ.रशीद, मुख्तारबी हमीदुल्ला पठाण, सपना बुर्से, सुवर्णा गाभणे या सदस्या नगराध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत. येथील नगराध्यक्षपदी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे.