नियमित पाणी, साफसफाई, चांगल्या रस्त्यांची अपेक्षा

By Admin | Updated: June 27, 2014 00:16 IST2014-06-26T23:50:41+5:302014-06-27T00:16:34+5:30

हिंगोली : नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा, साफसफाई, रस्ते आणि कामकाजात पारदर्शकपणा असावा, अशी अपेक्षा गुरूवारी ‘लोकमत’ आयोजित परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केली.

Expect regular water, cleaning, good roads | नियमित पाणी, साफसफाई, चांगल्या रस्त्यांची अपेक्षा

नियमित पाणी, साफसफाई, चांगल्या रस्त्यांची अपेक्षा

हिंगोली : नगरपालिकेने शहरातील नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, दररोज शहरात साफसफाई असावी व रहदारीसाठी चांगले रस्ते असावेत आणि कामकाजात पारदर्शकपणा असावा, अशी अपेक्षा गुरूवारी ‘लोकमत’ने आयोजित केलेल्य परिचर्चेत विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
‘हिंगोली शहराचा विकास व मुलभूत सुविधा’ या विषयावर ‘लोकमत’ कार्यालयात गुरूवारी परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, भाजपाचे नगरसेवक गणेश बांगर, काँग्रेसचे नेते डॉ. संतोष टारफे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल, व्यापारी महासंघाचे सचिव सुभासचंद्र लदनिया, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब तोष्णीवाल, महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे भास्कर बांगर, सामाजिक कार्यकर्ते नंदू व्यास आणि अन्नपुर्णा अ‍ॅर्बन बँकेचे चेअरमन गोवर्धन विरकुंवर यांनी सहभाग नोंदविला. या परिचर्चेमध्ये विविध मान्यवरांनी शहराच्या विकासासंदर्भात विविध संकल्पना मांडल्या, नगरपालिकेकडून अपेक्षा व्यक्त केल्या. त्यामध्ये पालिकेने शहर वासियांना नियमितपणे दररोज पाणीपुरवठा करावा, शहरात दररोज साफसफाई मोहीम राबवावी, चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करून त्यामध्ये पारदर्शकता असावी, शहरामध्ये वाढणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालावा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, देवडानगरमधील उद्यान जनतेसाठी खुले करावे, आदींचा त्यामध्ये समावेश आहे. नगराध्यक्ष चव्हाण यांनी या अपेक्षा पुर्ण करण्यास नगरपालिका कटीबद्ध असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे नमुद केले.
शहरात अनेक विकासात्मक योजना राबविण्यात आल्या आहेत. या पुढील काळातही त्या राबविल्या जातील, यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
शहराच्या विकासासाठी कटीबद्ध- दिलीप चव्हाण
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराच्या हद्द वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शहराच्या विकास आराखड्याची मुदत संपली आहे. आता पुढील १० वर्षासाठी विकास आराखडा लवकरच तयार केला जाणार आहे. त्यामध्ये विविध बाबींचा समावेश असणार आहे. पालिकेचे उत्पन्न वाढावे, यासाठी शहरात विविध ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहेत. पालिकेला विविध प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडे लोकवाटा भरणे आवश्यक आहे. यासाठी कर वसूलीही महत्वाची आहे. त्यामुळे घरपट्टी वाढीचे रिव्हीजन केले जाणार आहे. २४ तास सुरू राहणाऱ्या पथदिव्यांची समस्या मिटविण्यासाठी टायमर बसविण्यात येणार आहे. मंजूरीपेक्षा अधिक बांधकाम केलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच देवडा नगरमधील उद्यानाचा निर्णय चार ते पाच दिवसांत करण्यात येईल.
नियमितपणे साफसफाई करा- गणेश बांगर
१९८५ मध्ये नगरपालिकेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. त्यानंतर पालिकेत कर्मचारी भरती झालीच नाही. आता शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नियमित साफसफाई नसल्याने शहरातील विविध भागात नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पालिकेकडे चार आॅटो, पाच ट्रॅक्टर, एक छोटी जेसीबी कचरा उचलण्यासाठी आहे. त्यापैकी दोन ट्रॅक्टरच चालू आहेत. तीन वर्षापुर्वी घेतलेला छोटा जेसीबी जसा आणून ठेवला तसा त्याचा पालिकेने एकदाही पालिकेने उपयोग केला नाही, ही एक शोकांतीकाच म्हणावी लागेल. पालिकेकडे ६७ सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास २० कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. पाच ते सात कर्मचारी अग्निशमन दलात नियुक्त करण्यात आले आहेत. काही कर्मचारी कामावरच येत नाहीत. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
आरक्षित जागा शाळा, संस्थांच्या घशात- नंदू व्यास
नगर पालिकेने आतापर्यंत ज्या-ज्या भागामध्ये जागा आरक्षित ठेवल्या. त्यातील बहुतांश जागा विकसित करण्याऐवजी शाळा व संस्थांच्या घशात घातल्या. शहरातील पाईपलाईन टाकत असताना त्याखाली कॉक्रिट करणे आवश्यक होते; परंतु त्याला फाटा देण्यात आला.हे कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. विकास आराखडा पालिकेने गुंडाळून ठेवला असून स्वत:च्या सोयीनुसार पालिकेतील पदाधिकारी कामे करतात. तापडिया इन्स्टेट मधील जलतरण तलावाची जागा खासगी व्यक्तीला देण्याच्या घाट घालण्यात आला; परंतु हे कदापि होवू देणार नाही. नगर पालिकेच्या सर्व कामांची चौकशी करून दोषी नगरसेवकांना अपात्र ठरवून अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.
नगरसेवकच बनले कंत्राटदार- नईम शेख
हिंगोली नगरपालिकेतील नगरसेवकच कंत्राटदार बनले आहेत. त्यामुळे विकासाचा पुरता बोजवारा उडाला आहे. निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम शहरात केले जात आहे. पाईपलाईनचे काम समाधानकारक नाही. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषत: तापडिया इंटेट मध्ये मंजुरीपेक्षा अनेकांने अधिक बांधकाम केले आहे. शहरातील देवडा नगर येथील उद्यानाच्या बाजुला असलेल्या नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे धारकांनी दहा बाय दहाचे गाळे अनधिकृतपणे दहा बाय चाळीस केले आहेत. पालिका याकडे लक्ष देत नाही. शहरात दर्जेदार शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आराखड्याद्वारे विकास करावा- डॉ. संतोष टारफे
हिंगोली येथे नोकरी करण्यासाठी अनेक अधिकारी तयार नसतात, कारण येथे मुलभूत सुविधांची कमतरता आहे. शहराचा विकास करायचा असेल तर त्याचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. अवैध पद्धतीने तयार केल्या जाणारी प्लॉटिंग विकासात अडथळा ठरते. त्यामुळे अशा अवैध प्लॉट विक्रीवर निर्बंध आणले पाहिजेत. शहराचा विकास करण्यास निश्चितच वेळ लागतो. जनतेनेही त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे. यासाठी स्वत:च्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याचा अपव्यय करू नये, तसेच पालिकेकडे नियमितपणे कर भराणा करावा, जेणे करून पालिकेला शासनाकडे लोकवाटा भरून जनतेच्या विकासाच्या योजना राबविता येतील.
शहराच्या विकासाचे मापदंड ठरवा- गोवर्धन वीरकुंवर
शहराच्या विकासाचे मापदंड पालिकेने ठरविले पाहिजे. तसेच लोकप्रतिनिधी व जनतेनेही जागृकता दाखविली पाहिजे. जिल्ह्याचे ठिकाण असूनही शहरात एकही चित्रपटगृह नाही, चांगले उद्यान नाही, चांगले रस्ते नाहीत. मग बाहेरचे व्यापारी असोत की अधिकारी हिंगोलीत कशासाठी येतील? याचा नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. शहरालगतच्या नवीन वसाहतीमध्ये तर अनेक मुलभूत समस्या आहेत. पावसाळ्यामध्ये या भागातून चालणेही कठीण होवून जाते. याकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष देवून तेथेही रस्ते, वीज, पाणी या सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्या. अन्यथा मते मागण्यासाठी त्या भागात जाऊच नये.
नळयोजनेचे निकृष्ट दर्जाचे काम- बाळासाहेब तोष्णीवाल
शहरात नगर पालिकेच्या वतीने टाकण्यात आलेल्या नळ योजनेचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, शिवाय शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार केले जात आहेत. जलेश्वर तलावाच्या विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तेथेही निकृष्ट दर्जाच्या कामाचा कळस गाठल्याने आज या तलावाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. यासाठी नगर पालिकेतील सत्ताधारीच जबाबदार आहेत.
चांगले व्यापारी संकुल उभारा- सुभाषचंद्र लदनिया
शहरात रस्त्यावर बसून व्यापार करणारे अनेक छोटे व्यापारी आहेत. त्यांच्यासाठी नगर पालिकेने चांगले व्यापारी संकुल बांधून त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. या शिवाय शहरातील भाजी मंडईची अत्यंत वाईट स्थिती झाली आहे. येथे साफसफाईचा अभाव आहे. त्यामुळे येथून भाजी घेवून जाण्याची मानसिकता नसते. पालिकेने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शहरात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह उभारणे आवश्यक आहे. देवडा नगरमधील उद्यान पालिकेने सुरू केले पाहिजे.
ठराविक प्रभागातच साफसफाई- भास्कर बांगर
जे वजनदार नगरसेवक आहेत, त्यांच्याच प्रभागामध्ये पालिकेकडून साफसफाई मोहिम राबविली जाते. गरज नसलेल्या ठिकाणी पथदिवे बसविले जातात. पालिकेचे अधिकारी जेथे राहतात (नाईक नगर) तेथे चकाचक रस्ते केले जातात. अन् याच भागात दुसरीकडे मात्र रस्ता तयार करण्याचे नाव घेतले जात नाही, हा विरोधाभास कशासाठी? रस्ते तयार केल्यानंतर पालिकेकडून खड्डे तयार केले जातात. सिमेंट रस्ते तयार केल्यानंतर दोन रस्त्यांना जोडणाऱ्या नाल्यांवर छोटा पुल टाकला जात नाही. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
शहरवासियांच्या नगर पालिकेकडून अपेक्षा
शहराचा विकास आराखडा पुढील ४० वर्षाचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून पालिकेने तयार करावा.
शहरात उघड्यावर होणारी मांस विक्री बंद करून जनतेचा त्रास कमी करावा.
दिवसा शहरातून जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक बंद करावी.
शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालयासमोर गतिरोधक बसविण्यात यावे.
अग्रसेन चौक ते एसआरपीएफ कॅम्प या रस्त्या दरम्यान नगर पालिकेने पथदिवे बसवावेत.
शहरातील विविध भागांमध्ये घातक कचरा उचलून शहराबाहेर नेवून त्यावर प्रक्रिया करावी.
गरीब व गरजू व्यक्तींसाठी पालिकेने दवाखाना सुरू करावा.

Web Title: Expect regular water, cleaning, good roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.