पीकविम्याला मुदतवाढ; बँकांची अनास्था कायम
By Admin | Updated: August 3, 2014 01:12 IST2014-08-03T00:33:11+5:302014-08-03T01:12:59+5:30
हिंगोली : खरीप हंगामातील पीक विम्याच्या जनजागृत्तीबद्दल कृषी विभागाला सोयरसुतक नसल्याने वंचित उत्पादकांना विम्याच्या मुदतवाढीची मागणी करावी लागली.

पीकविम्याला मुदतवाढ; बँकांची अनास्था कायम
हिंगोली : खरीप हंगामातील पीक विम्याच्या जनजागृत्तीबद्दल कृषी विभागाला सोयरसुतक नसल्याने वंचित उत्पादकांना विम्याच्या मुदतवाढीची मागणी करावी लागली. अपेक्षेनुसार १६ आॅगस्टपर्यंत मूदतवाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना विमा देण्यात बँकांची अनास्था कायम आहे. खुद्द मध्यवर्ती बँकेलाच यंदाच्या टार्गेटचा विसर पडला असून पीकविमा दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
आजही बहुतांश शेतकऱ्यांकडून पीकविमा काढला जात नाही. मुळात शेतकऱ्यांना विम्याच्या मुदतीची माहिती नसते. कशीतरी महिती मिळाल्यानंतर बँकांच्या अनास्थेला सामोरे जावे लागते. खेटे मारून थकलेले शेतकरी पीकविम्याचा नाद सोडून देतात. जागरूक शेतकरी कागदपत्रांच्या कात्रीत अडकतात. यंदाही हीच बोंब झाल्याने विम्याची मुदत संपून गेली होती. परिणामी, उत्पादकांनी मुदतवाढीची मागणी केल्यानंतर १६ आॅगस्टपर्यंत कालावधी वाढवला; परंतु जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या अनास्थेमुळे वाढीव कालावधीदेखील उत्पादकांना अपुरा पडेल. नियमित ग्राहक सोडून विम्याच्या कामासाठी कर्मचारी नाक मुरडतात. शाखा व्यवस्थापकांनादेखील विम्याचे काम लादल्यासारखे वाटते.
परिणामी, बँकांचे उंबरे झिजवून उत्पादक विमा काढण्याचे सोडून देतात. म्हणून लीड बँकेने याकडे कटाक्षाने लक्ष देऊन जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना देण्याची मागणी होत आहे.
खरीप हंगामाच्या पीक विम्याबद्दल काहीही महिती नसल्याने एकदाही विमा काढला नसल्याचे अंबादास पांढरे आणि अर्जुन वाबळे यांनी सांगितले. तारखेची माहिती नाही, मुदत वाढवलेलीही माहिती नाही. यापूर्वी कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी याबद्दल काही सांगितलेही नाही. त्यामुळे कधी पीकविमा काढला नसल्याचे दोन्ही उत्पादक म्हणाले.
विम्याबद्दल शाखा व्यवस्थापक अनभिज्ञ
जिल्हातील उत्पादकांना यंदा देण्यात येणाऱ्या पीकविम्याच्या टार्गेटबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक अनभिज्ञ आहेत. नव्याने तारीख वाढवण्यापूर्वी काढलेल्या विम्याची माहितीसुद्धा बँकेकडून घेण्यात आलेली नाही. इतर बँकांनी कागदपत्रे पाठवून दिले असले तरी मध्यवर्ती बँकेकडून त्याचे मोजमाप केले नसल्याचे शाखा व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले. परिणामी जिल्ह्यातील कोणत्या बँकेने किती शेतकऱ्यांना विमा दिली, बँकांनी टार्गेट पूर्ण केले?, कोणाचे टार्गेट राहिले?, कोणत्या बँका उत्पादकांना विम्यास टाळाटाळ करतात? या बँकेला काहीही माहिती नसल्याचे शनिवारी समोर आले.
विम्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी बँकेतील कर्मचारी पैसे मागत असल्याची तक्रार हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तब्बल १६ बँकेची बेबाकी घेण्यासाठी लागत असलेली रक्कम विम्याच्या रक्कमेच्या पुढे जाते. शेतकऱ्यांना तत्काळ बेबाकी दिलीही जात नाही. पैशांसाठी चार-चार दिवस झुलवत ठेवल्या जात असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. निवेदनावर रामेश्वर गायकवाड, अनिल गायकवाड, दिलीप जाधव, संतोष गिरी, बाबूराव गायकवाड, माधव गायकवाड, रमेश जाधव, प्रकाशराव पोले, गणेश गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.