संग्रहालयाचा विस्तार
By Admin | Updated: November 16, 2015 00:41 IST2015-11-16T00:31:56+5:302015-11-16T00:41:26+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानात उभारलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा लवकरच विस्तार होणार आहे

संग्रहालयाचा विस्तार
औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानात उभारलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. सध्याच्या इमारतीवर दुसरा मजला बांधून त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या तैलचित्रांबरोबरच चलचित्रपटगृह, मीटिंग हॉल आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून ६ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी सिद्धार्थ उद्यानात दोन वर्षांपूर्वी मुक्तिसंग्राम संग्रहालय उभारण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय उभारण्यात आले असून, त्यात मुक्ती लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे लावण्यात आलेली आहे. अजूनही असंख्य स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे लावणे बाकी आहे. त्यामुळे आता या मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या हे संग्रहालय तळमजल्यापुरतेच मर्यादित आहे.
आता त्यावर एक मजला बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून या मजल्यासाठी ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात महानगरपालिकेचा वाटा ५० टक्के म्हणजे तीन कोटी ३१ लाख रुपये इतका असणार आहे. महानगरपालिकेने नुकत्याच मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे.
त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्राहालयाच्या विस्तारीकरणास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.