सोशल मीडियावरील एक्झीटपोल रडारवर
By Admin | Updated: November 17, 2016 00:47 IST2016-11-17T00:46:57+5:302016-11-17T00:47:32+5:30
उस्मानाबाद :‘एक्झिट पोल फेसबुक, वॉट्सअपवर घेऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्याविरूद्ध सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविला जाईल

सोशल मीडियावरील एक्झीटपोल रडारवर
उस्मानाबाद : कोण होणार नगराध्यक्ष ?...आपली कोणाला पसंती ?...कौल मनाचा...अशा प्रकारचे ‘एक्झिट पोल’ सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतले जात आहेत. अशा प्रकारचे पोल बनविणे अथवा प्रसारित करण्यास न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदी आहे. असे असतानाही जर कोणी अशा प्रकारचे पोल फेसबुक, वॉट्सअपवर घेऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्याविरूद्ध सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदविला जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. विभागीय आढावा बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगर परिषद निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात व्हाव्यात, यासाठी आवश्यक ती पाऊले उचलल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सहारिया म्हणाले, औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद, जालना, हिंगोली, बीड आणि परभणी या पाच जिल्ह्यांतील २८ नगर परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. ही निवडणूक भयमुक्त वातावरणा व्हावी, यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात आली आहेत. संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठीची सदरील बैठक घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून मतदारांना पैसे तसेच वस्तुच्या स्वरूपात प्रलोभने दाखविली जाऊ शकतात. हीच शक्यता लक्षात घेऊन उमेदवारांवर नजर ठेवण्याच्या अनुषंगानेही आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या निवडणूक खर्चावरही निवडणूक विभागाची करडी नजर असणार आहे. आता उमेदवारांना निवडणूक निकाल लागल्यानंतर तीस दिवसांच्या आत खर्च दाखल करणे बंधनकारक आहे. जे उमेदवार सदरील डेडलाईनच्या आत खर्च सादर करणार नाहीत, त्यांना अपात्र ठरविले जाईल. एवढेच नाही तर उमेदवारांकडून सादर करण्यात आलेला खर्च तपासण्याचे अधिकार निवडणूक यंत्रणेला देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान एखाद्या उमेदवाराने झाल्यापेक्षा कमी खर्च दाखविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितालाही अपात्र केले जाणार असल्याचे सहारिया म्हणाले.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या एक्झिट पोलबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यावर सहारिया म्हणाले की प्रींट, इलेक्ट्रिॉनिक अथवा सोशल मीडियावर मतदानापूर्वी कुठल्याही प्रकारचे एक्झिट पोल घेण्यास बंदी आहे. असे असतानाही कोणी सोशल मीडियाद्वारे पोल घेत असेल अथवा प्रसारित करीत असतील तर त्यांच्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हे नोंदविण्यात येतील, असे सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोशल मीडियावरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी आठ सेल स्थापन करण्यात आले आहेत. या सेलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या पोलवर करडी नजर ठेवावी, अशी सक्त सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतल्याचे ते म्हणाले. निवडणुकीतील मनी पॉवर रोखण्यासाठीही निवडणूक विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच चेकपोस्टही तयार सुरू केले आहेत. या माध्यमातून आजवर उस्मानाबाद, जालना आदी ठिकाणी कारवाया करून रोकड जप्त केल्याचे ते म्हणाले. यावेळी निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक एस. पी. यादव, नांदेड परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)