अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांची प्रकृती गंभीर
By Admin | Updated: August 10, 2016 00:29 IST2016-08-10T00:20:07+5:302016-08-10T00:29:42+5:30
औरंगाबाद : जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे त्यांना आज मंगळवारी तात्काळ शहानूरमियाँ

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांची प्रकृती गंभीर
औरंगाबाद : जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे त्यांना आज मंगळवारी तात्काळ शहानूरमियाँ दर्गा परिसरालगतच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिवदक्षता विभागात उपचार केले जात आहे. दरम्यान, जि.प. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवसभर रुग्णालयात जाऊन बेदमुथा यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमक्या दिल्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला आणि ते बसल्या जागीच कोसळले. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. आज मंगळवारी सकाळी ‘लोकमत’मधील हे वृत्त वाचल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. सकाळपासूनच बेदमुथा यांना पाहण्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समर्थनगर येथील रुग्णालयात गर्दी केली.
सिंचन विभागात १५ ते १६ कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. हा विभाग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा यांच्या अखत्यारीत आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा ठेवण्याचा आग्रह संभाजी डोणगावकर याने धरला होता. आपल्या सर्कलमध्ये सर्वाधिक कामांचे नियोजन करण्याविषयी सिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अधिकारी गायकवाड यांना दमदाटी केली.
गायकवाड यांनी त्यास नकार देत, वाटल्यास प्रभारीपदाचा राजीनामा देण्याची भूमिका बोलून दाखवली. त्यानंतर डोणगावकरने बेदमुथा यांना गायकवाड यांचा पदभार काढण्याची तसेच इतर कामे जर आपल्या वाट्याला नाही आली, तर मी एका एकाचे बघून घेईल, अशा धमक्या दिल्या. काम वाटपाच्या बैठका घेऊन तुम्हाला काय साध्य करायचे आहे, असे म्हणत थेट बेदमुथा यांच्यावर डोणगावकर याने हल्ला केला.