विहिरी खोदण्याचे काम जोरात
By Admin | Updated: June 19, 2014 23:48 IST2014-06-19T23:48:33+5:302014-06-19T23:48:33+5:30
केदारखेडा : परीसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी कपाशीची ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे

विहिरी खोदण्याचे काम जोरात
केदारखेडा : परीसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी कपाशीची ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे. कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे़ परंतु या कपाशीला अता ठिबक सिंचनाद्ववारे सुध्दा पाणी अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून विहीर खोदण्याचे काम वेगात सुरु केले आहे.
एकीकडे कपाशी जोमात असली तरी अद्याप पावसाचा अंदाज नसल्याने एरवी उन्हाळ्यात करता येणारे विहिरींचे खोदकामही शेतकरी करताना दिसत आहे़ गतवर्षी १५ ते २0 जून दरम्यान शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांना खताची मात्रा देऊन वखरपाळी केली होती़
मात्र या वर्षी अद्याप पाऊस आला नसल्याने शेतीच्या आंतरमशागती करुन शेतकरी पावसाची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. सर्व शेतकरी पड रे पाण्या ... पड रे पाण्या...भिजवू जमिनी अशा म्हणत असल्याचे चित्र आहे. पाऊस वेळेवर येईल या अशावर काही शेतकऱ्यांनी २ ते ५ जून दरम्यान ठिबक सिचंनद्ववारे अल्पशा पाण्याचा अधार घेऊन कपाशीची लागवड केलेली आहे़ परंतु या कपाशीचे पीकसुध्दा आता पावसाची वाट पाहत असल्याचे जाणवत आहे़
उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांना लग्नसराईच्या धामधुमीत विहिरींचे काम करता आले नाही, असे शेतकरी पावसाला उशीर झाल्याचा फायदा घेऊन विहिरीचे काम करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे़ मोठा पाऊस पडण्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
(वार्ताहर)