तेर येथील उत्खननात पाणी व्यवस्थापनाचे अवशेष हाती !
By Admin | Updated: March 26, 2015 00:55 IST2015-03-26T00:52:19+5:302015-03-26T00:55:24+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राज्याच्या पुरातत्त्व विभागामार्फत २८ जानेवारी २०१५ पासून उत्खननाला सुरुवात करण्यात आली

तेर येथील उत्खननात पाणी व्यवस्थापनाचे अवशेष हाती !
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राज्याच्या पुरातत्त्व विभागामार्फत २८ जानेवारी २०१५ पासून उत्खननाला सुरुवात करण्यात आली. २५ मार्च रोजी उत्खननावेळी पथकाच्या हाती सातवाहन काळातील सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरावा हाती लागला आहे.
तेर या गावामध्ये शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने जवळपास सहावेळा उत्खनन करण्यात आले. उत्खनना दरम्यान विविध प्रकारच्या पुरातन वस्तू आढळून आल्या आहेत. २८ जानेवारीपासून सुरु झालेल्या उत्खननात सातवाहन काळातील भिंतीचे अवशेष, तांब्याची नाणी, शंखापासून बनविलेले वेगवेगळे दागीने, विविध अलंकार, खापराची भांडी, रांजन, जळालेले गहू, तुरीची दाळ, तांदूळ अशा जवळपास हजारापेक्षा जास्त वस्तू आढळून आल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून चालू असलेले हे उत्खनन २६ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. बुधवारी कोटटेकडी भागात उत्खनन सुरु असताना सातवाहन काळातील सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरावा हाती लागला आहे. सातवाहन काळात सांडपाणी व्यवस्थापन केले जात असल्याचे पुरातत्त्च विभागाच्या संचालिका माया पाटील यांनी सांगितले. तर या अवशेषामुळे अभ्यासात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी नमूद केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
तेर येथे सुरु असलेले उत्खनन स्थळास जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी भेट दिली. उत्खननातील विविध बाबींची यावेळी माहिती घेतली. उपसंचालिका माया पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. (वार्ताहर)
४२७ मार्चला या सर्व मिळालेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.