दहावी-बारावीला नेमका अभ्यासक्रम किती, परीक्षा कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST2020-12-24T04:05:51+5:302020-12-24T04:05:51+5:30
--- औरंगाबाद ः दहावी बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली. मात्र, नेमकी परीक्षा कधी होणार, किती अभ्यासक्रम असणार यासंबंधी ...

दहावी-बारावीला नेमका अभ्यासक्रम किती, परीक्षा कधी ?
---
औरंगाबाद ः दहावी बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली. मात्र, नेमकी परीक्षा कधी होणार, किती अभ्यासक्रम असणार यासंबंधी प्रशासनाकडून निश्चित उत्तरे मिळत नसल्याने विद्यार्थी पालकांत संभ्रमावस्था कायम आहे. तर दुसरीकडे बोर्डाकडून प्रश्नसंच निश्चितीचे काम १०० टक्के अभ्यासक्रमावर सुरु झाले आहे. त्यामुळे नेमका अभ्यासक्रम किती व कोणता असा सवाल विद्यार्थी, पालक शिक्षकांतून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तिथे विद्यार्थी ५० टक्केही विद्यार्थी नियमित शाळांत उपस्थित होत नसल्याचे चित्र आहे. तर शहरात गेल्या आठवड्यापासून अकरावी व बारावीचे वर्ग सुरु झाले. मात्र, विद्यार्थी संख्या १५ टक्क्यांवर गेली नाही. आतापर्यंत जे शिकले ते आनलाईन त्यात विद्यार्थ्यांना अवगत किती झाले हा संशोधनाचा विषय असला तरी प्रत्यक्ष वर्ग सुरु झाल्यावर तरी ही संभ्रमावस्था दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किती आहे. कपात झाल्यास तो कोणता आहे. याबद्दलची कल्पना देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनात सर्वच जन शासनाकडे व वरिष्ठांकडे बोट दाखवत आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात येते. विभागातून दीड ते दोन लाख विद्यार्थी परीक्षा देतात. अद्याप प्रत्यक्ष वर्गच सुरु न झाल्याने एप्रिलच्या शेवट किंवा मे महिन्यात परीक्षेचा निर्णय होईल असे शिक्षणमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष केव्हापासून गृहित धरायचे हे देखील स्पष्ट नाही. त्याचा पेच आधी सुटल्यास त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करता येईल असे शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
--
प्रश्नसंचनिर्मितीचे काम
१०० टक्के अभ्यासक्रमावर सुरु
---
दहावी बारावीच्या प्रश्नसंच निर्मितीचे काम सुरु झाले आहे. सध्याचे काम १०० टक्के अभ्यासक्रमावर सुरु असून अंतिम निर्णय राज्य मंडळ घेईल. अभ्यासक्रम कपातीबद्दल अद्याप सूचना नाही. राज्य मंडळ व शासनाच्या निर्णयानंतर पुढील सूचनांनुसार प्रश्नपत्रिका अंतिम होईल. परीक्षांबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत.
-सुगता पुन्ने, विभागीय प्रभारी अध्यक्ष व सचिव, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ