विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:41 IST2017-08-16T23:41:37+5:302017-08-16T23:41:37+5:30
जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होणे शक्य आहे़, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले़

विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होणे शक्य आहे़, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले़
स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी संदेशपर भाषणात ते बोलत होते़ यावेळी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, खा़बंडू जाधव, आ़मोहन फड, आ़डॉ़राहुल पाटील, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते आदींची उपस्थिती होती़
पाटील म्हणाले, शेतकºयांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे़ नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी असो की शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी राबविलेली जलयुक्त शिवार योजना असो, सर्वच पातळीवर शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विकासाला अग्रक्रम दिला जात आहे़ विकासाभिमूख जिल्हा म्हणून परभणीची ओळख आहे़ विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून भविष्यात जिल्ह्याचा अधिक विकास करण्यासाठी आपण अग्रेसर राहू, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला़ सध्या पावसाने ताण दिल्यामुळे पीक परिस्थिती चांगली नाही़ पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपण वेळोवेळी आढावा घेत आहोत़ शेतकºयांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे़, असे ते म्हणाले़ स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ ध्वजवंदनेनंतर पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी तयार केलेल्या डिजिटल चित्ररथालाही पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला़ कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़