मंदिराच्या पावित्र्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे
By Admin | Updated: July 7, 2014 00:13 IST2014-07-06T23:21:54+5:302014-07-07T00:13:45+5:30
तुळजापूर : आषाढी एकादशी वारीनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुजारी व मंदिर कर्मचाऱ्यांची स्वच्छताविषयी आढावा बैठक घेतली.

मंदिराच्या पावित्र्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे
तुळजापूर : आषाढी एकादशी वारीनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुजारी व मंदिर कर्मचाऱ्यांची स्वच्छताविषयी आढावा बैठक घेतली. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता संदेश देणारी परिक्रमा दिंडी काढण्यात आली. या दिंडीस गादा धर्मशाळेपासून प्रारंभ करण्यात आला. ही दिंडी काळभैरव, नागझरी, आराधवाडी, भीमनगर, मातंगदेवी मार्गे महाद्वार चौकात आली. यात भजनी मंडळ, गोंधळी, टाळकरी यांच्यासह विश्वस्त नगराध्यक्षा विद्याताई गंगणे, व्यवस्थापक सुजीत नरहरे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, भोपी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, उपाध्ये मंडळाचे अशोक शामराज, मंदिर कर्मचारी, पुजारी आदी सहभागी झाले होते.
यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त देवीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात येतात. यासाठी मंदिर व परिसर स्वच्छ ठेवणे व त्याचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक पुजाऱ्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. यासाठी पुजाऱ्यांनी भाविकांना योग्य ते मार्गदर्शन करावे, स्वत: पुजाऱ्यांनी ड्रेसकोडमध्ये यावे, मंदिरात गुटखा, पान, तंबाखू खाऊ नये. मंदिर स्वच्छ कसे राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या. बैठकीनंतर महाद्वारासमोर बांगड्या विकणाऱ्या महिलांनी बांगड्या विक्रीसाठी जागा द्यावी, अशी मागणी डॉ. नारनवरे यांच्याकडे केली. यावर नगराध्यक्षा विद्याताई गंगणे यांना बांगड्या विक्रीस जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना केली. बैठकीस दिलीप नाईकवाडी, जयसिंग पाटील, पुजारी सुधीर कदम, नागेश अंबुलगे यांच्यासह भोपी, पाळीकर, उपाध्ये पुजारी उपस्थित होते. (वार्ताहर)