कापसाच्या भावात दररोज चढ-उतार
By Admin | Updated: December 28, 2015 00:15 IST2015-12-28T00:01:20+5:302015-12-28T00:15:19+5:30
जालना : जालना बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. कापूस, तूर, मूग तसेच सोयाबीनच्या भावात तेजी- मंदी कायम असून, आवकही रोडावली असल्याचे चित्र आहे.

कापसाच्या भावात दररोज चढ-उतार
जालना : जालना बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. कापूस, तूर, मूग तसेच सोयाबीनच्या भावात तेजी- मंदी कायम असून, आवकही रोडावली असल्याचे चित्र आहे.
जालना बाजार समिती भुसार मालासाठी प्रसिद्ध आहे. गत आठवड्यात बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. दिवसाकाठी ५० ते १०० पोत्यांची आवक होत आहे. भाव ४५०० ते ४७०० रूपये प्रतिक्विंटलचा भाव आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कापसाची आवकही मंदावली आहे. व्यापारी कापसाला जादा भाव देत असल्याने तसेच गुजरातमध्ये कापसाला चांगला मिळत असल्याने बाजार समितीत आवक कमी- जास्त होत आहे. कापसाचा ४४०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटलचा भाव आहे. कापसाचे भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र हंगाम शेवटच्या टप्प्यात असला तरी कापसाचे भाव साडेचार हजार रूपयांचा पुढे जाण्यास तयार नाहीत. परिणामी शेतकरही धास्तावले आहेत. व्यापारी सुदर्शन भुंबर म्हणाले, तुरीला ७५०० ते ८५०० प्रति क्विंटल भाव आहे. सोयाबीनची आवकही मंदावली आहे. आवक १ हजार पोते असून भावही ३७०० रूपये एवढे मिळत आहे. ढेपचा भाव २१०० रूपये एवढा आहे. मकाला १३०० रूपयांचा एकूणच बाजारात स्थिरता आहे. आगामी संक्रांत लक्षात घेता तीळ तसेच गुळाच्या बाजारात चांगली तेजी येईल असा अंदाज भुंबर यांनी व्यक्त केला. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेती मालाची अवस्था बिकट आहे. यामुळे बाजार समिती तसेच आठवडी बाजारांतील उलाढालीवर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)
गुजरात सरकार कापसाला क्विंटलमागे ५०० रूपयांचे बोनस देत आहे. यामुळे कापसाला पाच हजारांपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी कापूस विक्रीसाठी गुजरातला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासनानेही कापसाला ५०० रूपयांचे बोनस द्यावे, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. महाराष्ट्रात कापसाला अत्यल्प भाव मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कापसासाठी केलेला खर्चही भरून निघणे जिकिरीचे बनले आहे.