देशाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 00:38 IST2016-09-26T00:28:29+5:302016-09-26T00:38:20+5:30
औरंगाबाद : देश सुरक्षित राहिला तरच राज्य, धर्म, जात-पंथ, संस्कृती, परंपरा टिकून राहतील. यामुळे देशाच्या रक्षणासाठी आता प्रत्येकाने सज्ज होण्याची वेळ आली आहे.

देशाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे
औरंगाबाद : देश सुरक्षित राहिला तरच राज्य, धर्म, जात-पंथ, संस्कृती, परंपरा टिकून राहतील. यामुळे देशाच्या रक्षणासाठी आता प्रत्येकाने सज्ज होण्याची वेळ आली आहे. आवश्यकता पडल्यास युद्ध सुरू करण्यात सर्वात पुढे साधू-संत राहतील. कारण देशाचे रक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे, ती वीर अहिंसा आहे. तरुणांनी व्हॉटस् अॅप, फेसबुकमध्ये न रमता सैन्यात भरती होऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर शौर्य दाखवावे, असे आवाहन जैन समाजातील साधू-संतांनी केले.
पर्युषण पर्वानिमित्त सकल जैन समाज व खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर, राजाबाजारच्या वतीने रविवारी आयोजित सामूहिक क्षमापना महोत्सव निमित्ताने धर्मपीठावर सकल जैन समाजातील सर्व पंथातील साधू-संत, साध्वीजी एकत्र आले होते. धर्मपीठावर आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव, राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा, अरिहंतमुनीजी म.सा., कौशलमुनीजी म.सा., घनश्याममुनीजी म.सा, तसेच मुनिश्री सुयशगुप्तीजी म.सा., मुनिश्री चंद्रगुप्तीजी म.सा., आर्यिका कुलभूषणजी माताजी, साध्वी प्रज्ञाश्रीजी म.सा., साध्वी सुमिताश्रीजी म.सा., साध्वी सत्यवतीजी म.सा., साध्वी पुण्यदर्शनाजी म.सा., साध्वी शशीप्रज्ञाजी म.सा. यांची उपस्थिती होती. धर्मपीठावर उजव्या बाजूस उरी येथे शहीद झालेल्या १८ सैैनिकांच्या छायाचित्रांचे बॅनर लावण्यात आले होते. प्रारंभी, सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादेतील सकल जैन समाज एकजूट असून, येथे समाजातील सर्व परिवार एकत्र महावीर जयंती साजरी करत असल्याचा उल्लेख केला.
यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, किशनचंद तनवाणी, विकास जैन, प्रफुल्ल मालानी, नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार यांच्यासह सकल जैन समाजाचे जी. एम. बोथरा, ललित पाटणी, प्रकाश बाफना, विजयराज संघवी, राजाभाऊ डोसी, सुधीर साहुजी, जवेरचंद डोसी, रतिलाल मुगदिया, मिठालाल कांकरिया, चांदमल सुराणा, मदनलाल आच्छा, संजय संचेती, रवी मुगदिया, विनोद बोकडिया, ताराचंद बाफना, कन्हैयालाल रुणवाल, पुखराज पगारिया, गौतम संचेती, प्रकाश मुगदिया, डॉ. नवल मालू यांच्यासह श्रावक, श्राविका हजर होत्या. संचालन महावीर पाटणी यांनी केले. विलास साहुजी यांनी आभार मानले.
आपल्या मुलांना सैन्यात पाठवा
आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी सांगितले की, देशाच्या विकासात जैन समाज सदैव पुढे असतो.
आता समाजबांधवांनी आपल्या मुलांना सैन्यात पाठवून देशाचे रक्षण करण्यात हातभार लावावा.
थेट शहिदांच्या परिवाराला रक्कम देणार
राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा यांनी सांगितले की, जैन समाजाने शहिदांच्या परिवाराला मदत करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी. जमलेली रक्कम थेट शहिदांच्या परिवाराला सकल जैन समाजातर्फे नेऊन देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. संतांच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.