दर १२ दिवसाला एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला
By Admin | Updated: November 16, 2014 23:37 IST2014-11-16T23:32:55+5:302014-11-16T23:37:59+5:30
अमित सोमवंशी, उस्मानाबाद मागील सात वर्षात जिल्ह्यातील २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

दर १२ दिवसाला एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला
अमित सोमवंशी, उस्मानाबाद
मागील सात वर्षात जिल्ह्यातील २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील केवळ ६३ शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे मदत देण्यात आलेली असून, १४५ मदतीचे प्रस्ताव विविध कारणावरुन फेटाळण्यात आले आहेत. सद्यस्थितीत दोन प्रस्ताव समिती स्तरावर निर्णयासाठी राखीव असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्याला मागील काही वर्षापासून सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जिरायत शेती असलेले या भागातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. अपुऱ्या पावसामुळे उत्पन्नात घट झाल्यानंतर घेतलेले कर्ज कशाने फेडायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. त्यातूनच यातील बहुतांश आत्महत्या झाल्याचे सांगितले जाते. मागील तीन वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातच मागील वर्षी पिके जोमदार असताना जिल्ह्यातील मोठ्या भागाला गारपिटीने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच वाढत जात असल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना २०१४ मध्ये झाल्या असून, या चालू वर्षात तब्बल ३९ तर २००८ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत जिल्ह्यात २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील ६३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने मदत वाटप करण्यात आली तर १४५ जणांना मदतीपासून अपात्र करण्यात आले. ही प्रकरणे शासकीय नियमात बसत नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान यंदाही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठिशी राहून ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
आत्महत्येचा विचार मनात येत असल्यास शक्यतो एकटे फिरू नका. मन कशात तरी गुंतून राहील, असे पहा. मनोरंजनाची अधिकाधिक साधने वापरून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आत्महत्या करणारा माणूस एकटा राहतो, जेवत नाही, अबोल राहतो, अशा वेळी कुटुंबियांनी दखल घेतली पाहिजे. असा कुणी विचार व्यक्त केल्यास कुटुंबातील व्यक्तींनी थेट मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवून तात्काळ उपचार घेण्याची आवश्यकता आहे.