अखेर बोगस कार्डधारक प्रवाशाविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 12, 2015 01:00 IST2015-04-12T01:00:59+5:302015-04-12T01:00:59+5:30
वाशी : बोगस कार्डधारक प्रवाशाला तपासणीदरम्यान पकडूनही राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाचे पथक राजकीय पदाधिकाऱ्याच्या फोनमुळे पोलीस ठाण्यातून परत गेले होते़ याबाबत

अखेर बोगस कार्डधारक प्रवाशाविरुद्ध गुन्हा
वाशी : बोगस कार्डधारक प्रवाशाला तपासणीदरम्यान पकडूनही राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाचे पथक राजकीय पदाधिकाऱ्याच्या फोनमुळे पोलीस ठाण्यातून परत गेले होते़ याबाबत ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र, गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी गुरूवारी रात्री ‘त्या’ बोगस कार्डधारकाविरूध्द वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील पारडी (ता. वाशी) फ ाट्यावर बीड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे पथक तपासणी करत होते. त्यावेळी बीड ते येरमाळा जाणारी बसची (क्र.एमएच.२० डी.१७१९) तपासणी केली असता बसमध्ये एका इसमाने अस्थिव्यंग नसताना बोगस प्रमाणपत्र काढून त्याच्या आधारे प्रवास करत महामंडळाची फसवणूक केल्याचे समोर आले होते़ त्यावेळी योग्य ती कारवाई करून पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला घेवून वाशी पोलीस ठाणे गाठले़ बराच वेळ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यानच्या काळात ‘त्या’ प्रवाशाने एका राजकीय पदाधिकाऱ्याला फोन करून आपल्याविरूध्द गुन्हा दाखल होत असल्याची माहिती दिली़ त्यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन आला आणि अधिकाऱ्यांची पंचाईत झाली़ त्या अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाविरूध्द पोलीस ठाण्यात फिर्याद न देताच तेथून काढता पाय घेतला होता़ याबाबत ‘लोकमत’ने वृृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, पथकातील अधिकाऱ्यांना त्या प्रवाशाविरूध्द गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या़ त्यानंतर बीड विभागात सहाय्यक वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले राजू आसाराम आतकरे व एच.पी. बारगजे यांनी वाशी पोलीस ठाण्यात प्रवाशी अमोल जोगदंड (रा़गिरवली) याच्याविरूध्द तक्रार दिली आहे़ या तक्रारीवरून जोगदंड याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास एस.जी.माने हे करीत आहेत़ दरम्यान, बोगस पासद्वारे राज्य परिवहन महामंडळाला चुना लावणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार ? पोलीस प्रशासन आणि एस़टी़महामंडळाची भूमिका याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़