...तरीही निवडणूक काळात दारूविक्री घटली
By Admin | Updated: November 15, 2014 23:54 IST2014-11-15T23:49:05+5:302014-11-15T23:54:17+5:30
हिंगोली : नुकताच संपलेल्या लोकशाहीच्या सोहळ्यात गावोगाव दारूचा महापूर वाहिल्याचे ऐकिवात असताना आकड्याकडे पाहिल्यानंतर उलट स्थिती दिसून येते.

...तरीही निवडणूक काळात दारूविक्री घटली
हिंगोली : नुकताच संपलेल्या लोकशाहीच्या सोहळ्यात गावोगाव दारूचा महापूर वाहिल्याचे ऐकिवात असताना आकड्याकडे पाहिल्यानंतर उलट स्थिती दिसून येते. प्रामुख्याने आॅक्टोबर महिन्यात देशी मद्याची विक्रीतर साडेपाच टक्क्यांनी घसरली असताना विदेशी व बिअरची स्थिती यापेक्षा निराळी नाही. वाईनला कोणी वाली नसल्याचे आकडे सांगतात; परंतु वास्तव चित्र वेगळेच होते, हेही तेवढेच खरे.
निवडणुकीत फुकट मिळत असल्यामुळे कधीही न पिणारे झुलतात. तळीरामांच्या खिशातच बाटल्या असतात. गावागावात दारूची पोहोचती केल्या जात असल्याचे चित्र प्रत्येक निवडणुकीत पाहवयास मिळते. ग्रामीण भागापेक्षा शहरातील सुशिक्षित वर्गाची पसंत निराळी असते. निवडणुकीत देशीऐवजी विदेशी मद्याला पसंती मिळाल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला उलट अनुभव आला. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दारूविक्री घटली. मागील मे, जून, जुलैै आणि आॅगस्टपेक्षाही आकडे घसरले. आॅक्टोबरमध्ये देशी मद्याची विक्री दुपटीने घसरली. परिणामी, ५.५९ टक्क्यांनी आकडे घटले. विदेशी मद्याचीही हीच गत झाली. आॅगस्टमधील १७.९० वरून सप्टेंबरमध्ये १५.४२ टक्क्यांवर आली. आॅक्टोबर महिन्यात म्हणावी तशी वाढ झाली नाही. दोन्हीपेक्षा बिअरला साफ नकारल्याचे दिसून येते. आॅगस्टमध्ये बिअरची २४.६५ टक्के विक्री होती. ती सप्टेंबरमध्ये ७.५१ तर आॅक्टोबरमध्ये ५.३३ टक्के घसरली. वाईनला जिल्ह्यात कोणी वाली राहिले नाही. सगळ्या मद्यापेक्षा बरी असल्याचा शिक्का असलेल्या वाईनला कोणी तोंड लावले नाही. त्यामुळे जुलैत ११.६२ टक्के वाईनची विक्री झाल्यानंतर सातत्याने आकडे घसरले. सप्टेबरमध्ये उणे १.८८ टक्के वाईनची विक्री झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी दारूविक्री चांगली होती. तद्नंतर निवडणुकीच्या दोन्ही महिन्यात दारूविक्रेत्यांना नुकसान सोसावे लागल्याचे आकडे सांगतात. निवडणुकीत अधिक मद्य विक्रीचा अंदाज खोटा ठरला आहे. (प्रतिनिधी)