दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच
By Admin | Updated: October 4, 2014 23:55 IST2014-10-04T23:55:03+5:302014-10-04T23:55:03+5:30
औरंगाबाद : नवरात्रोत्सवात फुलांच्या भावाने शंभरी गाठली होती. मात्र, दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच दिसून आला. शहरात दररोज ८ ते ९ टन फुलांची मागणी असते.

दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच
औरंगाबाद : नवरात्रोत्सवात फुलांच्या भावाने शंभरी गाठली होती. मात्र, दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच दिसून आला. शहरात दररोज ८ ते ९ टन फुलांची मागणी असते. मात्र, शनिवारी २ ते ३ टनच फुले बाजारात आल्याने चढ्या दरातच फुलांची विक्री झाली.
जून महिन्यात झेंडूची लागवड होत असते. मात्र, यंदा महिनाभर उशिराने पावसाने हजेरी लावली. परिणामी, बहुतांश ठिकाणी झेंडूची लागवड झाली नाही. ज्या शेतातील विहिरीत पाणी आहे, तेथील शेतकऱ्यांनीच झेंडूची लागवड केली. यामुळे दरवर्षीपेक्षा निम्म्याने उत्पादन कमी झाले.
दरवर्षी औरंगाबादेत दौलताबाद, वेरूळ, गांधेली, पिसादेवी, पोखरी, सावंगी, कोलठाणा या परिसरातून झेंडूची आवक होत असते. याशिवाय हिंगोली, जिंतूर, जळगाव, नेवासा, नगर आदी भागातूनही झेंडू शहरात आणला जातो. मात्र, परजिल्ह्यांमधून यंदा झेंडूची आवक नगण्य झाली. परिणामी, शहरात मागणीच्या तुलनेत कमी आवक झाल्याने झेंडूचे भाव कडाडले होते. दसऱ्याच्या दिवशी ५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत झेंडू विक्री झाला. झेंडूला चांगला भाव मिळाल्याने विक्रेते खुश झाले होते. कारण, शेतकऱ्यांकडून ४० रुपये किलोने खरेदी केलेल्या झेंडूची दुप्पट भावाने विक्री झाली.
यात शेतकऱ्यांचा नव्हे, तर विक्रेत्यांचा फायदा झाला. मात्र, काही शेतकऱ्यांनी स्वत: गजानन महाराज मंदिर परिसर, गारखेडा, शिवाजीनगर, जालना रोड, हर्सूल टी पॉइंट, टीव्ही सेंटर चौकात झेंडू विकला, त्यांना फायदा झाला.
झेंडू महागल्याने किलोभर फूल खरेदी करणारे अर्धा किलो किंवा पावशेर खरेदी करण्यातच धन्यता मानत होते. दसरा संपल्यानंतर शनिवारी मागणी कमी झाल्याने झेंडू व अन्य फुलांचे भाव कमी होतील, असा अंदाज होता; पण तसे झाले नाही. आजही झेंडू अडत बाजारात ७० ते ८० रुपये किलोनेच विक्री झाला.