पाच वर्षानंतरही महिलेस धनादेश मिळेना
By Admin | Updated: September 12, 2014 00:24 IST2014-09-12T00:00:49+5:302014-09-12T00:24:25+5:30
जालना : घनसावंगी तालुक्यातील नांदी येथील एका महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला

पाच वर्षानंतरही महिलेस धनादेश मिळेना
जालना : घनसावंगी तालुक्यातील नांदी येथील एका महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला. मात्र अद्यापही सदर महिलेस जिल्हा परिषदेकडून मदतीचा धनादेश मिळेनासा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही जि.प. आरोग्य विभागाने अनास्था दाखविली आहे.
नांदी येथील यमुनाबाई पांडुरंग माळी यांच्यावर ११ नोव्हेंबर २००९ रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली. मात्र ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर महिलेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर विमा कंपनीकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा प्रकरणात ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हा परिषदेने याबाबत फारसे गांभीर्य न घेतल्याने पाच वर्षानंतरही सदर महिलेस मदत मिळालेली नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर महिलेस धनादेश देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे ९ सप्टेंबर रोजीच्या स्थायी समिती बैठकीत म्हटले होते.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एम. भटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यमुनाबाई माळी यांना कुटुंब कल्याण विमा योजनेअंतर्गत संबंधित विमा कंपनीकडून उशिराने प्राप्त झालेला ३० हजार रुपयांचा धनादेश मुदत संपण्यापूर्वी दहा दिवस अगोदर देण्यात आला.
४सदरील लाभार्थीने धनादेश बँकेत न वटविता मुदत संपल्यानंतर या कार्यालयास परत केल्यामुळे नूतनीकरणासाठी धनादेश विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. सदर धनादेश प्राप्त होण्यास विलंब होत असल्यामुळे माळी यांना विमा कंपनीकडून प्राप्त होणारा संभाव्य धनादेश जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जालना यांचेकडे जमा करण्याच्या लेखी हमी पत्र घेण्याच्या अटीवर धनादेश देण्यात येत आहे. हा धनादेश ११ सप्टेंबर रोजी दुपारी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.