२३ वर्षानंतरही मने कोलमडलेलीच...
By Admin | Updated: September 30, 2016 01:17 IST2016-09-30T00:58:23+5:302016-09-30T01:17:56+5:30
बालाजी बिराजदार , लोहारा ३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपाला आज २३ वर्षे पूर्ण होत आहेत़ या इतक्या वर्षात उध्दवस्त झालेली घरे पुन्हा उभारली गेली आहेत़ अनेकजण स्थिरावत असून,

२३ वर्षानंतरही मने कोलमडलेलीच...
बालाजी बिराजदार , लोहारा
३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपाला आज २३ वर्षे पूर्ण होत आहेत़ या इतक्या वर्षात उध्दवस्त झालेली घरे पुन्हा उभारली गेली आहेत़ अनेकजण स्थिरावत असून, अनेकांनी आयुष्याची नव्याने सुरूवात केली आहे़ मात्र, त्यानंतरही अप्तेष्ठांना गमावल्याचे दु:ख कायम आहे़ सप्टेंबर महिना उजाडल्यानंतरच या भागातील अनेकजण व्याकूळ होवून त्या प्रलयंकारी भूकंपाने हेलावून जातात़
विघ्नहर्त्या श्री गणेशाला थाटामाटात निरोप देवून निद्रेच्या आधीन झालेल्या अनेकांसाठी ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट आपल्या कवेत विनाशक घेवूनच आली होती़ पहाटे ३़५५ च्या सुमारास सास्तूर, किल्लारीसह उस्मानाबाद,लातूर जिल्हा भूकंपाने हादरला़ त्यापूर्वीही काही दिवस अगोदरपासून भूकंपाचे धक्के सुरूच होते़ मात्र, २३ वर्षापूर्वी पहाटेच्यावेळी झालेल्या या ६़५ रिस्टर स्केलच्या धक्क्याने लोहारा आणि परिसरातील गावेच्या गावे बेचिराख झाली़ काय होतय हे समजण्याअगोदरच सुमारे १० हजारापेक्षा अधिक नागरिकांचा जीव या भूकंपाने घेतला़ १६ हजारापेक्षा अधिक नागरिक त्यात जखमी झाले तर उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यातील ५२ गावे आणि त्यातील ५३ हजार घरे उध्दवस्त झाली़ आज ३० सप्टेंबर रोजी या भागातील अनेकांच्या डोळ्यासमोर त्या प्रलयाच्या आठवणी उभ्या राहतील़
भूकंपानंतर ४१ पैकी १९ गावात ९ हजार ११ घरकुले बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ यातील बहुतांश जणांना हक्काचे घर मिळाले असले तरी बांधकाम कंपन्यांनी केलेला कानाडोळा आणि इतर विविध कारणांमुळे अद्यापही काही कुटुंबे घरकुलापासून वंचित असल्याचे चित्र भूकंपग्रस्त भागात दिसून येते़ यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून, काही प्रकरणात एका घरकुलाचा कबाला दुसऱ्याच्या नावावर तर दुसऱ्याचे घरकूल तिसऱ्याच्या नावावर झालेले असल्याने अनेकांना अद्यापही हक्काच्या घरकुलापासून वंचित रहावे लागले आहे़ शासनाने या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे़