पोहरादेवी येथे बंजारा धर्मपीठाची स्थापना
By Admin | Updated: March 14, 2016 00:39 IST2016-03-14T00:20:08+5:302016-03-14T00:39:42+5:30
लातूर : बंजारा समाजाच्या धर्मपीठाची स्थापना वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवीला होणार आहे. रामनवमी दिवशी पोहरादेवी येथे बंजारा धर्मपरिषद भरणार असल्याची माहिती

पोहरादेवी येथे बंजारा धर्मपीठाची स्थापना
लातूर : बंजारा समाजाच्या धर्मपीठाची स्थापना वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवीला होणार आहे. रामनवमी दिवशी पोहरादेवी येथे बंजारा धर्मपरिषद भरणार असल्याची माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे हिरालाल राठोड यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत दिली.
हिरालाल राठोड म्हणाले, बंजारा काशी पोहरादेवी, उमरी येथे भव्य भक्तीधाम उभारण्यात आले असून, तेथे सर्व देवतांचे मंदिर, संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा रामनवमी दिनी होणार आहे. यावेळी राष्ट्रसंत प.पू. रामराव बापू पिठाधीश्वर यांचे आशिर्वचन होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील बंजारा समाज बांधव या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बंजारा साहित्य व सांस्कृतिक परिषद होणार असून, या सोहळ्याला बंजारा लेखक, विचारवंत, साहित्यिक, कवी, गीतकार, प्रबोधनकार यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यानिमित्त विजापूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, पुसद, पोहरादेवी येथे भव्य पालखी मिरवणूकही निघणार आहे. पोहरादेवी येथे प.पू. रामराव बापू स्वत: श्री हमुलाल महाराज यांच्या पालखीचे स्वागत करणार आहेत.
भक्तीधामाच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि समाजातील नेते उपस्थित राहणार आहेत. साहित्य, धर्म परिषद आणि धर्मपीठाची स्थापना होणार असल्याने देशभरातील बंजारा समाज या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे हिरालाल राठोड यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अंकुश जाधव, सुरेश चव्हाण, गणपत राठोड, प्रा.प्रभू आडे, उषा आडे, बाबूराव जाधव, विश्वनाथ राठोड, अमृतराव चव्हाण आदींची उपस्थिती होती.