शासकिय कला महाविद्यालयात ‘आर्ट क्लस्टर’ उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:52+5:302021-02-06T04:07:52+5:30
औरंगाबाद : शासकिय कला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जुन्या इमारतीमध्ये ‘आर्ट क्लस्टर’ उभारण्याची मागणी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटनेच्या (शाकम ...

शासकिय कला महाविद्यालयात ‘आर्ट क्लस्टर’ उभारावे
औरंगाबाद : शासकिय कला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जुन्या इमारतीमध्ये ‘आर्ट क्लस्टर’ उभारण्याची मागणी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटनेच्या (शाकम कनेक्ट) शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
किलेअर्क येथील शासकिय कला महाविद्यालयाची ‘जनाना महाल’ ही निजामकालीन वास्तू अखेरच्या घटका मोजत आहेत. १९७१ ते २००३ दरम्यान येथे शासकिय कला महाविद्यालय होते. ते नवीन इमारतीत हलवण्यात आल्याने जुनी इमारत ओसाड पडली. वास्तूत आता पत्त्यांचे क्लब, दारूच्या पार्ट्या आणि गायींचे गोठे भरत आहेत. या वास्तूच्या संवर्धनासाठी माजी विद्यार्थी संघटना १७ वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
१३ ऑगस्ट २० ते १३ ऑगस्ट २०२१ हे महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे.
‘शाकम कनेक्ट’च्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शहरात आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. आपण कलाप्रेमी आहात. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात याठिकाणी आर्ट क्लस्टर उभारावे. क्लस्टरमुळे येथे आर्ट गॅलरी, लायब्ररी, एक्झीबीशन सेंटर, ॲम्पी थिएटर, काॅन्फरेन्स हॉल, कलाग्राम, टूरिस्ट फॅसिलीटी सेंटर, संशोधन आणि माहिती केंद्र तसेच सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करण्यासाठीचे व्यासपीठ तयार होईल. शिष्टमंडळात किशोर निकम, दीपक आर्य, आरतीश्यामल जोशी, मोईन शेख, विजया पातुरकर यांची उपस्थिती होती.
चौकट....
मुंबईत भेट घेणार
यासंदर्भात ‘शाकम कनेक्ट’चे उपाध्यक्ष मोईन शेख म्हणाले, महाविद्यालयाची ‘जनाना महाल’ ही जुनी इमारत केवळ वास्तु नसून शहराचा समृद्ध इतिहास आहे. त्याला गतवैभव देण्यासाठी येथे आर्ट क्लस्टरचा प्रस्ताव मुख्यमंंत्र्यांना दिला. लवकरच शाकम कनेक्टचे शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून याबाबत सविस्तर सादीरकरण करेल. मुख्यमंत्री त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आहे.