दलालांकडून प्रवासी पळविणे अद्याप सुरूच
By Admin | Updated: August 4, 2014 01:55 IST2014-08-04T01:45:28+5:302014-08-04T01:55:54+5:30
औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे

दलालांकडून प्रवासी पळविणे अद्याप सुरूच
औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे; परंतु अभियान सुरू असतानाही प्रवाशांना पळविण्याचा प्रकार सुरूच आहे. एकीकडे शिवनेरीच्या फेऱ्या रद्द केल्याने, तर दुसरीकडे दलालांकडे दुर्लक्ष होत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी पळविले जात आहेत.
औरंगाबाद- पुणे मार्गावर ११ शिवनेरी बस धावतात; मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिवनेरी बसच्या फेऱ्या वारंवार रद्द होत असून हा प्रकार थांबत नसल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळी ८, सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजेच्या अशा एकूण तीन फेऱ्या रद्द झाल्या.
रविवारी पुण्याला जाणाऱ्यांची मध्यवर्ती बसस्थानकात अधिक गर्दी असते. शिवाय पुण्याला जाण्यासाठी शिवनेरी बसच्या प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
सायंकाळी प्रवास करण्यावर बहुतांश जणांचा भर असतो; परंतु नेमक्या याच वेळेतील फेऱ्या रद्द होण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. शिवनेरीच्या ज्या फेऱ्या रद्द होतात, नेमक्या त्याच वेळेत बसच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना पळविणारे दलाल दिसतात. दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आला; परंतु त्याव्यतिरिक्त दलालांना रोखण्यासाठी महामंडळाकडून कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.