उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांचा धुव्वा
By Admin | Updated: April 3, 2017 22:44 IST2017-04-03T22:42:14+5:302017-04-03T22:44:39+5:30
दगीरअत्यंत रंगतदार ठरलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली हुकूमत पुन्हा कायम राखत चौखुर उधळलेला पालकमंत्र्यांचा वारु काँग्रेसने उदगीरात अडविला़

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्र्यांचा धुव्वा
चेतन धनुरे उदगीर
अत्यंत रंगतदार ठरलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपली हुकूमत पुन्हा कायम राखत चौखुर उधळलेला पालकमंत्र्यांचा वारु काँग्रेसने उदगीरात अडविला़ १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकत काँग्रेस प्रणित पॅनलने बाजार समितीवर आपला झेंडा रोवला. पदरी पडलेल्या सलगच्या पराभवानंतर मिळालेले हे यश काँग्रेससाठी जणू ‘ओयासिस’च ठरले़ तर पालकमंत्री संभाजीराव पाटील तसेच आमदार सुधाकर भालेराव यांच्यासाठी हा धक्का ठरला़
उदगीर कृउबाच्या संचालक मंडळासाठी रविवारी तब्बल ९५ टक्के मतदान झाले़ सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली़ तेव्हा भाजप प्रणित पॅनलचे व्यापारी मतदारसंघातील सचिन हुडे वगळता अन्य सर्व जागांवर काँग्रेस प्रणित पॅनलचे उमेदवारांनी जोरदार आघाडी घेतली. तेव्हाच चित्र स्पष्ट झाले होते़ या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण गटातून काँग्रेस प्रणित पॅनलचे सर्व ७ उमेदवार विजयी झाले़ धनाजी जाधव (४१७ मते), सुभाष धनुरे (४१०), कल्याण पाटील (४४२), रमेश पाटील (४०२), शिरीषकुमार पाटील (३८९), गजानन बिरादार (३८३) व रामराव बिरादार ३९० मते घेऊन विजयी ठरले़ सोसायटी महिला गटातून काँग्रेस प्रणित पॅनलच्याच गंगुबाई श्रीमंडळे ४०२ तर चंचलाबाई लोहकरे ४३६ मते घेऊन विजयी झाल्या़ सोसायटी इतर मागासवर्गीय गटातून पद्माकर उगिले ४१३ मते घेऊन विजयी झाले़ सोसायटी विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून संजीव पवार ३५३ मते घेऊन विजयी झाले़ ग्रा.पं.च्या सर्वसाधारण गटातून सिद्धेश्वर पाटील ४९३ तर संतोष बिरादार यांनी ४१५ मते घेत विजयाला गवसणी घातली़ ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून ३७३ मते घेत मोहन गडीकर यांनी विजय मिळविला़ ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटकातून अनिल लांजे यांनी ४०७, हमाल मापारी मतदारसंघातून गौतम पिंपरे १९८, व्यापारी मतदारसंघातून कैलास पाटील ६०४ मते घेऊन विजयी झाले़ तर एकमेव जागा पदरात पडलेल्या भाजप प्रणित पॅनलचे सचिन हुडे हे विक्रमी ८५१ मतांनी विजयी झाले़ निकाल जाहीर होताच काँग्रेसने जल्लोष साजरा केला.