मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया
By Admin | Updated: June 4, 2017 00:40 IST2017-06-04T00:36:41+5:302017-06-04T00:40:19+5:30
औरंगाबाद :मंगळवारपासून अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंगळवारपासून अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
यासंदर्भात शिक्षण उपसंचालक वैजीनाथ खांडके म्हणाले की, मंगळवारी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांसाठी देवगिरी महाविद्यालयामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांना अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश पद्धतीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. याच बैठकीत संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यांना अकरावीच्या प्रवेशाबाबत शिक्षण संचालनालयाने तयार केलेल्या पुस्तिकेचे वितरण केले जाणार आहे.
शिक्षण उपसंचालक खांडके म्हणाले की, विद्यार्थ्यांना अकरावीसाठी दोन टप्प्यांत आॅनलाइन नोंदणी करता येईल. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वत:विषयीची सामान्य माहिती नोंद करता येईल. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अभ्यासक्रमाची शाखा, विषय, महाविद्यालयांना प्राधान्यक्रम देता येईल. दहावीमध्ये मिळालेल्या गुणांची माहिती नमूद करता येईल. मंगळवारपासून अकरावीसाठी आॅनलाइन नोंदणीचा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाइटवर ताण येणार नाही. महापालिका क्षेत्रात १०४ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी केंद्रीय पद्धतीने अकरावीला प्रवेश देण्यासाठी ८९ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे. या महाविद्यालयांमध्ये २२ हजार ९४० एवढी प्रवेश क्षमता आहे.