दर्शन प्रवेशावरून सर्वपक्षीय विरोधात प्रशासन आमने-सामने
By Admin | Updated: September 3, 2016 00:27 IST2016-09-03T00:20:11+5:302016-09-03T00:27:31+5:30
अजित चंदनशिवे , तुळजापूर नवरात्रोत्सव काळात भाविकांना व इतरांना महाद्वारातूनच देवी दर्शनासाठी प्रवेश मिळावा, यासाठी व्यापारी-पुजाऱ्यांसह सर्वपक्षीया आक्रमक झाले आहेत़

दर्शन प्रवेशावरून सर्वपक्षीय विरोधात प्रशासन आमने-सामने
अजित चंदनशिवे , तुळजापूर
नवरात्रोत्सव काळात भाविकांना व इतरांना महाद्वारातूनच देवी दर्शनासाठी प्रवेश मिळावा, यासाठी व्यापारी-पुजाऱ्यांसह सर्वपक्षीया आक्रमक झाले आहेत़ तर प्रशासन मागील वर्षीच्या फॉर्म्युल्यावरच ठाम असल्याने तुळजापुरात सर्वपक्षीयांविरोधात प्रशासन आमनेसामने आले आहे़ सर्वपक्षीयांनी शनिवारी तुळजापूर बंदची हाक दिली आहे़ तर पालकमंत्र्यांनी सर्वसंबंधितांची बैठक घेवून तोडगा काढण्याचे निर्देश दिल्याने शनिवारी होणाऱ्या घडामोडीकडे आता लक्ष लागले आहे़
मागील वर्षीच्या नवरात्रोत्सव काळात प्रशासनाने देवी दर्शनासाठी भाविकांना महाद्वारातून प्रवेश न देता घाटशीळ मार्गे मंदिरात सोडले होते़ भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच हा निर्णय घेतल्याचे सांगत त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आल्याचा दावा प्रशासनाने केला होता़
दरवर्षी नवरात्रोत्सव काळात महाद्वारासमोर भाविकांची कोंडी होत होती़ मात्र, गतवर्षी ती झाली नव्हती़ शिवाय भाविकांनाही अत्यंत सुलभ पध्दतीने दर्शन मिळाल्याचे सांगत तीच पध्दत यावर्षीही राबविण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे़ मात्र, प्रशासनाच्या या निर्णयामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा पुजाऱ्यांसह व्यापाऱ्यांचा आरोप असून, त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे़