सीड पार्कसाठी उद्योजकांनी पुढे यावे- देशमुख
By Admin | Updated: February 4, 2016 00:34 IST2016-02-04T00:29:16+5:302016-02-04T00:34:30+5:30
जालना : जिल्ह्यात सीड पार्कचे नियोजन करण्यात आले असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बियाणे उद्योजकांनी पुढे यावे, त्यांच्या संकल्पना शासनाला सादर कराव्यात,

सीड पार्कसाठी उद्योजकांनी पुढे यावे- देशमुख
जालना : जिल्ह्यात सीड पार्कचे नियोजन करण्यात आले असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बियाणे उद्योजकांनी पुढे यावे, त्यांच्या संकल्पना शासनाला सादर कराव्यात, असे आवाहन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले.
सीड पार्क तसेच शेडनेट मधील सीडचे उत्पादन, गट शेती, शेतकरी कंपन्या यांचा आढावा घेण्यासाठी देशमुख बुधवारी जालन्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बियाणे उद्योजक व अधिकाऱ्यांच्या बैठकीत देशमुख बोलत होते. कृषी संचालक जयंत देशमुख, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, वर्ल्ड बँकेचे नाईक, सल्लागार शालिग्राम वानखेडे , प्रकल्प अभ्यासक चेनत भक्कड आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जालना, औरंगाबाद व बुलडाणा तसेच अन्य सीड कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी सीड पार्क होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून येथे काय करता येऊ शकते, कोणत्या उपाययोजना असाव्यात, उद्योजका व शेतकऱ्यांसाठी काय आवश्यक आहे यावर आपले मत व्यक्त केले. यात महिकोचे मिश्रा, अजित सीडचे अजित मुळे, समीर अग्रवाल आदी प्रमुख उद्योजकांनी आपले मत व्यक्त केले. यात प्रामुख्याने आयात- निर्यात केंद्रासोबतच, फळ तसेच भाज्यांवर जे रोग पडतात त्याचे निदान करण्यासाठी बेंगळुरू येथे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा तसेच उद्योजकांचा मोठा वेळ खर्ची होतो. या प्रयोग शाळेचे केंद्र पार्कमध्ये होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. हा प्रकल्प सुपीक जमिनीत करावा यामुळे येथे बियाणांवर प्रयोग करणे सोयीस्कर होण्यासाठी सुपीक जमीन करणे गरजेचे आहे. जालना व कर्नाटकातच भाजीपाला व हायब्रीड निर्मिती होते. त्याच धरतीवर हा पार्क उभारणीची गरज व्यक्त केली. जिल्हाधिकारी नायक यांनी संपूर्ण प्रकल्प तसेच होणाऱ्या सुविधांची माहिती दिली. उद्योजकांकडून काही अभिप्राय आल्यास त्यानुसार येथे सुविधा पुरविणार असल्याचे नायक म्हणाले. कृषी आयुक्त देशमुख म्हणाले, सीड पार्क जालन्यासाठी मोठा प्रकल्प आहे. मात्र प्रकल्प चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्यासाठी उद्योजकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासाठी उद्योजकांनी पुढे येण्याची गरज आहे. काही उद्योजक कर्नाटक येथून बियाणे उत्पादन करतात आणि जालना येथे उत्पादन झाल्याचे भासवितात तसे चालणार नाही असा इशाराही देशमुख यांनी दिला. कापूस बियाणांचे उत्पादन सर्वात जास्त इतर ठिकाणी होत असले तरी त्याची मागणी व कापूस उत्पादन सर्वात जास्त महाराष्ट्रात होत असल्याचे म्हणाले.