प्रवेशाला शिक्षणाचा जागर

By Admin | Updated: June 16, 2017 00:50 IST2017-06-16T00:48:40+5:302017-06-16T00:50:12+5:30

बीड : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात गुरुवारी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला.

Entrance to Education Jagar | प्रवेशाला शिक्षणाचा जागर

प्रवेशाला शिक्षणाचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात गुरुवारी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांची बैलगाडी, रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वृक्षारोपण, पुस्तकांचे वाटप करुन ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. प्रभातफेरी, लेझीम प्रात्यक्षिके व उपक्रमातून सकाळपासून दुपारपर्यंत गावागावांमध्ये शिक्षण पंढरी अवतरल्याचे दृश्य होते.
राजपिंप्रीत रथ मिरवणूक
गेवराई : जिल्हा परिषद बीडचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम खूप जल्लोषात साजरा झाला. यावेळी सकाळी प्रवेश दिंडी काढण्यात आली. प्रवेशपात्र मुलांना फेटे बांधून, नवे गणवेष घालून अश्वरथातून मिरवणूक काढण्यात आली.
या शैक्षणिक दिंडीत गावातील भजनी मंडळ, ग्रंथपालखी, लेझीम पथक, ढोलीबाजा, कलशधारी मुली, विद्यार्थी, ग्र्रामस्थ, शिक्षक तसेच अधिकारी-पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी होते.
यावेळी उप शिक्षणाधिकारी सूरजकुमार जयस्वाल यांनी शाळा शंभर टक्के प्रगत करण्याचे तसेच शौचालय बांधून गाव हागणदारी मुक्त करण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी शाळेत वृक्षरोपण झाले.
कन्हेरवाडीत लोकसहभागातून ई- लर्निंग
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी जि. प. के. प्रा शाळेमध्ये पहिल्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले. कै.माधवराव मुंडे यांचे नाव असलेल्या कमानीचे लोकार्पण करण्यात आले. ई- लर्निंगसाठी गोविंद बबन फड, माणिक फड, राजाभाऊ फड, सूर्यकांत मुंडे यांनी आर्थिक योगदान जाहीर केले.
सीईओ आष्टी तालुक्यात
आष्टी : तालुक्यातील २७६ प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावे यासाठी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननवरे यांनी पुढाकार घेतला. शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच वृक्षारोपण व इतर उपक्रम घेण्यात आले.
तालुक्यात नियुक्त पथकात खुद्द बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननवरे यांच्यासह गटविकास अधिकारी आप्पा साहेब सरगर, गटशिक्षण अधिकारी धनजंय शिंदे, केंद्र प्रमुखांसह ७२ जणांचा समावेश होता. आष्टी, कडा व दौलावडगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. पारगाव जोगेश्वरी येथे बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली.
शाळांना निधीचे आश्वासन
केज : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे बांधकाम व इतर शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडे ५५ कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती देऊन सुर्डी, सोनेसांगवी शाळेच्या विकासासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी गुरुवारी दिले. त्यांनी केज तालुक्यातील विविध शाळेतील कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
दरम्यान, सभापती देशमुख, शिक्षणाधिकारी (मा.) विक्र म सारुक यांनी जोला येथील प्राथमिक शाळेत मुक्काम करून जोला, सोनेसांगवी, युसूफवडगाव, सारणी, आनंदगाव येथील शाळांना भेटी दिल्या.
आयुष्याशी बांधिलकी
अंबाजोगाई : पहिलं पाऊल पहिलं वृक्ष लावून हा पंचायत समितीने राबविलेला उपक्रम आयुष्याशी बांधिलकी जोपासणारा आहे. यामुळे मुलांना आयुष्यभर झाड आणि शाळेची ओढ कायम राहील., असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश हंडे यांनी तालुक्यातील चनई येथे केले.
या कार्यक्रमास न्यायमूर्तींसह उप मुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी, सभापती मीनाताई भताने तसेच अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील खापरटोन येथे दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पालक, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
ठिकठिकाणी उत्सव
माजलगाव तालुक्यातील गंगामसला, परळी तालुक्यातील नंदणज, संस्कार विद्यालय, वैद्यनाथ विद्यालय, बरकतनगर, कन्हेरवाडी, सोनहिवरा, लेंडेवाडी, बीड तालुक्यातील समनापूर, चौसाळा, शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथेही विविध उपक्रम घेण्यात आले.

Web Title: Entrance to Education Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.