जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By Admin | Updated: June 20, 2016 00:49 IST2016-06-19T23:16:21+5:302016-06-20T00:49:07+5:30

परभणी : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात दाखल झाला असून परभणी शहरासह बहुतांश तालुक्यांत रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

The entire rain in the district | जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

परभणी : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात दाखल झाला असून परभणी शहरासह बहुतांश तालुक्यांत रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. मोठा पाऊस झाल्यानंतरच जिल्ह्यामध्ये पेरण्यांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा थांबलेली नाही.
शनिवारी रात्री १० वाजेपासून परभणी शहर आणि परिसरात पावसाला प्रारंभ झाला. रात्रीच्या सुमारास तुरळक असलेल्या या पावसाने रविवारी पहाटेपासून मात्र बऱ्यापैकी जोर धरला. पहाटे पाच वाजेपासून पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. शहर परिसरात मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. सकाळी ९ वाजेपर्यंत हा पाऊस होता. रविवारी सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी सुरुच होत्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाच ते दहा मिनिटांचा जोरदार सडाका झाला. त्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत भूरभूर पाऊस होत होता. या पावसामुळे शहरातील सखल भागात तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. अल्पशा पावसानेही शहरातील रस्त्यांची दैना झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, ताडकळस येथे पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)
पूर्णा तालुका : ९.८ मि.मी. पावसाची नोंद
पूर्णा तालुक्यात १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसास सुरुवात झाली. काही वेळ विश्रांती घेत रात्रभर रिमझिम पाऊस पडला.
पूर्णा, चुडावा, कावलगाव, ताडकळस, एरंडेश्वर, कात्नेश्वर , वझूर आदी भागात कमी-अधिक प्रमाणात हा पाऊस होता. महसूल विभागाच्या नोंदीनुसार एकूण ४९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
तालुका पर्जन्यमान अहवालानुसार पूर्णा मंडळ १२ मि.मी. ,चुडावा १८, कात्नेश्वर १.०, ताडकळस ८.०, लिमला १० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरीमध्ये ९.८ मि.मी. पाऊस झाल्याची माहिती महसूल विभागाचे शिवप्रसाद वाव्हळे यांनी दिली.
गंगाखेड तालुक्यात सरासरी ६ मि.मी. पाऊस
गंगाखेड तालुक्यात चारही मंडळात शनिवारी रात्री ९ वाजेपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. गंगाखेड मंडळात ५ मि.मी., महातपुरी ३, राणीसावरगाव ४, माखणी सर्वाधिक १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण २४ मि.मी.पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. ६ मि.मी. सरासरी पाऊस झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार श्रीरंग कदम यांनी दिली आहे.
सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ येथेही १९ जून रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. सेलू, मानवत, पाथरी येथे रविवारी पावसाचा जोर होता. या पावसामुळे सेलू येथे मोंढ्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांची फजिती झाली.

Web Title: The entire rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.