जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: September 1, 2014 00:24 IST2014-09-01T00:15:13+5:302014-09-01T00:24:27+5:30
नांदेड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मघा नक्षत्रापासून गती घेतली.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
नांदेड: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मघा नक्षत्रापासून गती घेतली. आठवडाभरापासून सातत्याने पाऊस होत असल्याने जिल्ह्यात अडीचशे मिमीचा टप्पा ओलांडला. शनिवारपासून पूर्वाचा प्रारंभ झाला़ त्यानंतर रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला़ गतवर्षीपेक्षा दुपटीने पाऊस कमी असला तरी विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे़
मृग, आर्द्रा कोरड्या गेल्यानंतर पुनर्वसूच्या शेवटच्या टप्प्यात मान्सूनचे आगमन झाले. तोपर्यंत पेरणीला दीड महिन्याचा उशीर झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नव्हते. पुष्य नक्षत्राच्या अर्ध्यानंतर पाऊस गायब झाला होता. अपेक्षा असतानाही आश्लेषा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम राहिला. पंधरवड्याचा खंड पडल्याने पिकांना बाधा पोहोचली. वाढ खुंटली, रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता पाऊस पडतो की नाही, अशी स्थिती उद्भवली. १६ आॅगस्ट रोजी मघा निघाल्या.
पहिला आठवडा कोरडा गेला़ पोळ्यापासून पावसाचे आगमन झाले. शनिवारी पूर्वा नक्षत्रास सुरूवात झाली.
दोन महिन्यांत जेवढा पाऊस झाला तेवढा पाऊस या नक्षत्रात पडला. त्यामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले. पिके खुलली, हिरवी पडली. शेतकऱ्यांच्याही जिवात जीव आला. मघाने उत्पादकांना दिलास दिला, पिकांना वरदान मिळाले.
सर्वत्र पिके वाढीस लागली. चाराटंचाई दूर झाली. पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली; परंतु जनावरांच्या पाण्याचा प्रश्न संपलेला नाही. बहुसंख्य ओढे, नाले कोरडे असल्याने नद्यांना पाणी आलेले नाही.
परभणी जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीला पाणी आले आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पिण्यासाठी पाण्याची सोय झाली असून टंचाईचे संकट दूर झाले आहे़ (प्रतिनिधी)
तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी
नांदेड - ४३़६२ मि़ मी़, मुदखेड - ३८़६७, अर्धापूर - ३४़३३, भोकर - ३०़७५, उमरी- २५, कंधार - ४८़५०, लोहा - ७९, किनवट ४५़८५, माहूर - ३५़ ७५, हदगाव - ३५़ १५, हिमायतनगर- ५१़६७, देगलूर - १३, बिलोली - २४़४०, धर्माबाद - १३, नायगाव - ५२़ २० आणि मुखेड तालुक्यात ४५़१५ मि़ मी़ पावसाची नोंद करण्यात आली़