जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: July 8, 2014 01:01 IST2014-07-07T22:57:59+5:302014-07-08T01:01:40+5:30
जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून बळीराजा पेरणी व लागवडीच्या कामाला लागला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वरूणराजाचे आगमन उशिरा झाले आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.३२ मि.मी. असून ७ जुलैपर्यंत किमान १७७. ६९ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात या तारखेपर्यंत केवळ ४.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. भोकरदन तालुक्यात रात्री उशिरा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर जालन्यासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद तालुक्यांमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. पहाटे ३ ते ६ या वेळेत जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
गुरूवारी जालना शहरात सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.
याशिवाय गोलापांगरी, पारडगाव, वडीगोद्री व अंबड तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने ७ जुलैपूर्वी जिल्ह्यात २१.४७ मि.मी. पावसाची नोंद होती. रविवारी मध्यरात्रीनंतर १०.९९ मि.मी. पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पावसाची नोंद ३२.४६ मि.मी. एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची लागवड, पेरणीसाठी लगबग
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात गेल्या महिनाभराची पावसाची प्रतीक्षा संपली असून परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे़ यामुळे ७ रोजी जवळपास ८0 टक्के लागवडी केल्या़ पावसाचा एकही थेंब पावसाचा पडला नसल्याने शेतकऱ्यानी पेरणीपूर्व मशागती करुन पावसाची प्रतीक्षा करीत होते़ पावसाने विलंब केल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला होता़
६ रोजी अचानक जोरदार पाऊस बरसला़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने दि़७ रोजी सकाळीच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग सुरु केल्याची दिसून आले़ आज जवळपास ८0 टक्के शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे समजते़
या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे़ गतवर्षी १0 जुलैपर्यंत खरिपाच्या पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली होती़ या वर्षी पेरण्या लाबंल्या असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे़
रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारनंतरही जालना तालुक्यात काही भागात ठिकाणी ढगाळ वातावरण होते